बिघडलेल्या आरोग्याची होणार चौकशी
By Admin | Updated: November 8, 2014 22:39 IST2014-11-08T22:39:09+5:302014-11-08T22:39:09+5:30
ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपये देण्यात आले. परंतु या पैशाचा वापर आरोग्य सेवेसाठी न करता त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

बिघडलेल्या आरोग्याची होणार चौकशी
सर्वसाधारण सभेत निर्णय : आक्रमक सदस्यांचा मानव विकास कार्यक्रमात गडबडीचा आरोप
गोंदिया : ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपये देण्यात आले. परंतु या पैशाचा वापर आरोग्य सेवेसाठी न करता त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करीत या प्रकरणात सालेकसाच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेरण्यात आले. शेवटी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.
जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर, राजेश चांदेवार, राजलक्ष्मी तुरकर, उषा हर्षे, विष्णू बिंझाडे यांनी आरोग्य विभागाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही.
परंतु बोगस शिबिरे दाखवून बोगस बिलाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पैसे काढल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
जि.प. सदस्य राजेश चतुर यांनी ढाकणी येथे कार्यरत ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून चौकशीत दोषी आढळलेल्या या ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाई किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जि.प.चे अधिकारी ग्रामसेवकाला संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. जि.प. सदस्य पंचम बिसेन यांनी तिरोडा तालुक्याच्याा सितेपार, सेलोटपार येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची मजुरी अद्याप देण्यात आली नाही, असे सांगितले.
राजेश चतुर व राजेश चांदेवार यांनी मलेरिया व डेंग्युचा प्रकोप असूनही आरोग्य विभाग कर्तव्यशून्य असल्याचे म्हटले. जि.प. सदस्य उषा हर्षे यांनी कालीमाटी, चिरचाळबांध येथील रस्त्याच्या बांधकामात कोणताही मुद्दा उपस्थित न झाल्याचे जि.प. सदस्य अर्जुन नागपुरे म्हणाले. जनहितसाठी उपस्थित केलेले मुद्दे बैठकीच्या अहवाल पुस्तिकेत नमूद होत नाही. त्यावर अध्यक्ष शिवणकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले.
जि.प. सदस्य कल्याणी कटरे, देवकी नागपुरे, प्रेमलता दमाहे यांनी जिल्हा प्रशिक्षण केंद्रात नियुक्त असलेले डॉ.विजय वानखेडे यांनी मागील चार वर्षापासून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सभागृहात केला. जिल्हा परिषदेने डॉ.वानखेडे यांचा पदभार न काढल्यास जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला. त्यावर शिवणकर यांनी डॉ.वानखेडे यांचा कार्यभार तत्काळ काढण्यात येईल व चौकशी करण्यात येईल असे सांगितले.
महिला बालकल्याण सभापती सविता पुराम व पं.स.सदस्य संगीता शहारे यांनी २ नोव्हेंबर रोजी सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चार दिवसांपासून कुलूप बंद होते असे सांगण्यात आले. तेथे कचरा व घाण पसरलेली होती.
त्या आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचे सात रुग्ण दाखल होते. हा मुद्दा उपस्थित होताच अध्यक्ष शिवणकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांना सभागृहात बोलावून विचारणा केली. त्यांनी या संदर्भात माहिती देत आपण डॉ.विजय वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सांगितले.(तालुका प्रतिनिधी)