१० एकरातील धानपीक नष्ट
By Admin | Updated: May 12, 2015 01:30 IST2015-05-12T01:30:25+5:302015-05-12T01:30:25+5:30
विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया तालुक्याच्या दत्तोरा येथील शेतकऱ्यांचे १० एकरातील धानपीक

१० एकरातील धानपीक नष्ट
विद्युत पुरवठा खंडित : १५ दिवसांपासून शेतकरी त्रस्त
गोंदिया : विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया तालुक्याच्या दत्तोरा येथील शेतकऱ्यांचे १० एकरातील धानपीक नष्ट झाले. १२ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपीक वाळले आहे.
रावणवाडी विद्युत कार्यालयांतर्गत येणाऱ्या दत्तोरा येथील शेताला पाणी देण्यासाठी शेतपरिसरात असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड आला.परिणामी शेतपिकाला पाणी देता आले नाही. तीव्र उन्हामुळे शेतकऱ्यांचे धानपीक पाण्याअभावी वारले आहे. शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा नसल्याने मागील दहा ते बारा दिवसांपासून शेतकऱ्यांनी लाईनमन गायधने व सहाय्यक अभियंता अनंत प्रसादकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. परंतु लाईनमन फोन बंद ठेवतात तर अभियंता फोन उचलून आज करू उद्या करू असे बोलून टाळतात. हा प्रकार मागील १० ते १२ दिवसांपासून सुरू आहे. शेतीला पाणी न मिळाल्यामुळे दत्तोरा येथील लक्षमी महारवाडे, उमेश महारवाडे, सतीश मेश्राम, मधुकर डोंगरे, बबलू शेंडे यांच्या शेतातील १० एकरातील धानपीक पाण्याअभावी नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी १० दिवसांच्या काळात ५० वेळा अभियंत्याला संपर्क साधला. यात काही वेळा फोन लागला तर काही वेळा त्यांनीही आपला फोन बंद करून ठेवला होता. विद्युत अभावी शेतीला पाणी मिळू शकले नाही व पाण्याअभावी धानपीक नष्ट झाले आहे. ऐन गर्भात असणाऱ्या धानाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
२५ जणांना कनेक्शन दिले नाही
दत्तोरा येथील २५ शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षापासून विद्युत कनेक्शन करीता अर्ज केले. परंतु त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही. मागील चार महिन्यापूर्वी विद्युत वितरण कंपनीने या गावातील शेतातवर विद्युत खांब गाडले. दोन महिन्यापूर्वी वाहिन्या टाकल्या. परंतु शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले नाही.