जलयुक्त शिवार योजनेत प्रशासनाची उदासीन भूमिका
By Admin | Updated: February 26, 2015 00:59 IST2015-02-26T00:59:24+5:302015-02-26T00:59:24+5:30
राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याचे स्त्रोत विकसित करण्याचा निर्णय घेतला.

जलयुक्त शिवार योजनेत प्रशासनाची उदासीन भूमिका
गोंदिया : राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याचे स्त्रोत विकसित करण्याचा निर्णय घेतला. पण या अभियानाच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा प्रशासनाची भूमिका उदासीन असल्यामुळे कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही हे अभियान राबविण्याच्या बाबतीत औदासिन्य येत आहे.
जलयुक्त अभियानात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या अभियानातून कोणत्या गावात काय करता येईल, याची माहिती सर्व विभागांकडून मागविण्यात आली. जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेल्या जिल्हास्तरीय समितीने त्या माहितीच्या आधारावर कोणत्या तालुक्यात कोणती कामे करायची याचे नियोजन केले. त्यानुसार निधीही दिला जात आहे.
दि.१९ ला तिरोडा तालुक्यातील घोगरा ग्रामपंचायतअंतर्गत पाटीलटोला येथील मामा तलावावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्यासह या अभियान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, गटविकास अधिकारी जमईवार, तहसीलदार, कृषी अधिकारी आदी सर्व छोटेमोठे अधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनीच दांडी मारली. या कार्यक्रमाला हजर राहण्याऐवजी ते कुटुंबियांसोबत नागपूर येथे फिरायला गेले असल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक त्या दिवशी शासकीय सुटी असली तरी इतर सर्व अधिकारी या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ असल्यामुळे तिरोडा येथील कार्यक्रमाला आवर्जुन हजर होते. त्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही यावेळी हिरमोड झाला. एवढेच नाही तर आमदार रहांगडाले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने वेळीच कारभार सुधारण्याची मागणी आहें. (जिल्हा प्रतिनिधी)