विभागीय शिक्षक मेळावा
By Admin | Updated: December 15, 2014 22:59 IST2014-12-15T22:59:09+5:302014-12-15T22:59:09+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने नागपूर विभागीय कार्यशाळा व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे दोन मंत्री

विभागीय शिक्षक मेळावा
मंत्र्यांनी फिरविली पाठ : प्राथमिक शिक्षक कार्यशाळेतून वेधले लक्ष
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने नागपूर विभागीय कार्यशाळा व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे दोन मंत्री व जिल्ह्यातील पाचही आमदार आमंत्रित असताना एक आमदार वगळता सर्वच आमदारांनी तसेच मंत्र्यांनी या मेळाव्याकडे पाठ दाखविली. दुसरीकडे थाटात पार पडलेल्या या कार्यशाळेतही शिक्षकांच्या अनेक समस्यांवर मंथन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नागपूर विभागीय कार्यशाळा व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेनुसार कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे आमदार राजकुमार बडोले व विशेष अतिथी म्हणून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह, प्रमुख अतिथी म्हणून खा.नाना पटोले व जिल्ह्याचे सर्वच आमदार आमंत्रित होते. मात्र उद्घाटनाच्या नियोजित वेळेपर्यंत एकही मान्यवर उपस्थित न झाल्याने जि.प. सभापती मोरेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आयोजक समितीला पार पाडावा लागला. शिक्षक मेळाव्यात मंत्र्यांसह खासदार व आमदार उपस्थित न झाल्याने अनेक शिक्षकांनी खंत व्यक्त केली. परंतु मेळावा तेवढ्याच उत्साहात पार पडला.
यावेळी मंचावर जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, आ.गोपालदास अग्रवाल, जि.प. सभापती मोरेश्वर कटरे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. शिक्षण सभापती मदन पटले, जि.प. सदस्य तुंडीलाल कटरे, आमगावचे सभापती हनुवंत वट्टी यांच्यासह समितीचे राज्याध्यक्ष काळुजी बारसेपाटील, सरचिटनीस उद्य शिंदे, राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मेळावा व कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या वैयक्तिक व धोरणात्मक समस्या व मागण्यांवर चर्चा केली. दरम्यान, मंचावर उपस्थित राज्यकर्त्यांकडून शासन दरबारी जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या मांडून मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. परंतु या कार्यशाळेत एकही पदाधिकाऱ्याने जि.प. शाळांच्या खालावलेल्या दर्जावर चर्चा घडवून आणली नाही.
अत्यंत थाटात प्राथमिक शिक्षक समितीचा सोहळा पार पडला असला तरी विरोधी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)