देवरी व दवनीवाडा पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:13+5:302021-03-29T04:17:13+5:30
देवरी-परसवाडा : होळीच्या सणात कायदा व सुव्यवस्था कायम राखता यावी यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली असून, यातच देवरी पोलिसांनी ...

देवरी व दवनीवाडा पोलिसांचे धाडसत्र
देवरी-परसवाडा : होळीच्या सणात कायदा व सुव्यवस्था कायम राखता यावी यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली असून, यातच देवरी पोलिसांनी ५, तर दवनीवाडा पोलिसांनी ४ अवैध दारूविक्रेत्यांवर धाड घालून २८ हजार ९७८ रुपयांची दारू व अन्य माल जप्त केला आहे. देवरी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली आहे.
यामध्ये, देवरी पोलिसांनी, चिचगड चौकात विपीन श्रीभोलाराम बिलावर (४०, रा. डोंगरगड) हा दारूची वाहतूक करतो, या माहितीवरून त्याला पायी जात असताना पकडले. त्याच्याजवळील पांढऱ्या थैलीत २,१३० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या १,००० मिलीच्या ३ बाटल्या मिळून आल्या. त्यानंतर अवैध दारू विक्रेता चुन्नीलाल रामा नंदेश्वर (४८, रा. मरामजोब) याच्या घरी धाड घालून ७०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या ५ बाटल्या जप्त केल्या. शुद्धोधन ऊर्फ सुधाकर मोहन फुल्लुके (३५, रा. धोबीसराड) यांच्या घरातून १,०४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २० बाटल्या, विनोद बळीराम बन्सोड (४०, रा. खुर्शीपार) यांच्या ढाब्यावर धाड घालून १,९२४ रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३७ बाटल्या, तर जितेश युवराज मानवटकर (३३, रा. शेंडा) याच्या अंडा दुकानावर धाड घालून पिण्याच्या पाण्याचा खोक्यातून व दुचाकी क्रमांक एमएच-३५ व्ही-५३९३ च्या डिक्कीतून देशी दारूच्या बाटल्या, असा १५,९०४ रुपयांचा माल जप्त केला. अशा प्रकारे पोलिसांनी ५ ठिकाणी धाड घालून २१ हजार ६९८ रुपयांचा माल जप्त केला,
तर दवनीवाडा पोलिसांनी, मुरलीधर प्रल्हाद गजभिये (४९, रा. रतनारा) याच्याकडून १,८०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३० बाटल्या, देवचंद नेतलाल चिखलोंडे (३५, रा. रतनारा) याच्याकडून २,२८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३८ बाटल्या, सीमा राजू फुलके (३५, रा. रतनारा) हिच्याकडून २,००० रुपये किमतीची मोहफुलाची २० लिटर दारू, तर नरेस देवीदास टेंभुर्णीकर (५२, रा. परसवाडा) याच्याकडून १,२०० रुपये किमतीची हातभट्टीची १२ लिटर दारू जप्त केली. अशा प्रकारे एकूण ७,२८० रुपयांचा माल जप्त केला आहे.