मनमानीला लगाम लावल्यानेच जि.प.पदाधिकाऱ्यांचा पोटशूळ
By Admin | Updated: April 7, 2017 01:32 IST2017-04-07T01:32:34+5:302017-04-07T01:32:34+5:30
जिल्हा परिषदेतील बांधकामाच्या कामांसह इतर अनेक मनमानी कारभाराला विरोधक या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या

मनमानीला लगाम लावल्यानेच जि.प.पदाधिकाऱ्यांचा पोटशूळ
विरोधकांचा आरोप : सभापती पी.जी. कटरेंच्या अटकेची मागणी
गोंदिया : जिल्हा परिषदेतील बांधकामाच्या कामांसह इतर अनेक मनमानी कारभाराला विरोधक या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी लगाम लावून गैरप्रकार होऊ दिला नाही. त्यामुळेच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा पोटशूळ उठला आणि त्यातून सभापती कटरे यांनी राष्ट्रवादीच्या महिला सदस्य सुनिता मडावी यांच्याशी अभद्र व्यवहार केला आणि विरोधी सदस्यांवर खोटे आरोप लावले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील विरोधीपक्ष नेते गंगाधर परशुरामकर व इतर पदाधिकाऱ्यांनी केला.
गेल्या ३ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गुरूवारी पत्रकारांपुढे आपली बाजू मांडली.
यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्यासह गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष अशोक सहारे, जि.प.सदस्यगण सुरेश हर्षे, मनोज डोंगरे, कैलास पटले, सुनिता मडावी, दुर्गा तिराले, राजलक्ष्मी तुरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही जि.प.सदस्य उपस्थित होते.
राकाँ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभा सुरू होण्याची वेळ असताना आम्ही विरोधी सदस्य आणि अधिकारी सभागृहात तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपापल्या पक्षाच्या बैठकांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे बैठक एक तास उशिरा सुरू झाली. पाणी टंचाईवरून चर्चा शिक्षणावर आली त्यावेळी कैलास पटले यांनी विद्यार्थ्यांच्या नुकसानीची पदाधिकाऱ्यांना फिकीर नाही असे म्हणून ‘या झोलबा पाटलाच्या वाड्यात येऊन काय फायदा’ असे निराशाजनक उद्गार काढले. मात्र हे वाक्य असंवैधानिक नसताना विनाकारक त्यावरून वादळ उठविले आणि पुढील वाद वाढला. वास्तविक सभापती कटरे हे अनेक वेळा महिलांसोबत असभ्य बोलल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुनिता मडावी यांच्यावर सभापती कटरे यांनी ग्लासमधील पाणी फेकल्यानंतर त्यांचा बिपी वाढला. त्यांना सावरण्यासाठी आम्ही गेलो तर आमच्यावरच आळ आणल्याचे परशुरामकर म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)