डासांना नष्ट करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी
By Admin | Updated: October 21, 2014 22:55 IST2014-10-21T22:55:10+5:302014-10-21T22:55:10+5:30
नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे.

डासांना नष्ट करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी
गोंदिया : नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे. शहरवासी सध्या वेगळ्या समस्येला तोंड देत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरवासी त्रस्त झाले असून त्यांना रात्री झोपणे देखील अवघड झाले आहे. अशात डेंग्यूच्या प्रकोपाने शहरवासीयांत दहशत निर्माण झाली असून डांसावर आळा घालण्यासाठी पालिकेने सफाई व फवारणी अभियान राबवावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत.
यावर्षी हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी थंडीचे प्रमाण बरेच कमी आहे. सध्या धान कापणीचा हंगाम जोमात आहे. या काळात धान पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. धान कापणीला काही काळ अकाली पावसामुळे विलंब झाला होता. यामुळे धान पिकांवरील डास शहरात पसरले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी पडत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे बोलल्या जात आहे. गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत सदैव उदासीन आहे. शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची नियमितपणे साफ-सफाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे अस्तव्यस्त स्वरूपात पसरले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या घाणीच्या प्रादुर्भावामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
रात्रीच्या वेळेस डास व किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शहरवासीयांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस घरातील दिवे सुरू ठेवणे देखील शहरवासीयांना अवघड झाले आहे. हे किडे चावा घेत असल्याने घरातील बालगोपाल. असुरक्षीत आहेत. किड्यांचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात कधीच नव्हता. यावर्षी थंडी कमी असल्याने व उष्णतेचे प्रमाण अजूनही काही प्रमाणात कायम असल्याने किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्या असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये आहे. कुठल्याही चौकात सध्या किडे हा चर्चेचा विषय झाला आहे. अद्यापही नगर परिषदेच्या वतीने शहरात डासनाशक फवारणी करण्यात नसल्याने शहरवासीयांमध्ये नगर प्रशासनाप्रति रोष आहे. शहरातील गटारांची व केरकचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची आहे. मात्र या विभागाकडून अद्यापही शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची साफसफाई न करण्यात आल्याने डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यातल्या त्यात शहरातील सिव्हील लाईंन्स परिसरात डेंग्यूने थैमान घातल्याने शहरवासीयांत अधिकच दहशत निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून मात्र अद्याप ठोस पाऊलण्यात आले नसल्याचे दिसून येते. बघावे तेथे कचरा पडून असल्याने पालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह लागतो. तरी शहरात डासनाशक फवारणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)