धान पिकाच्या भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:00+5:302021-07-07T04:36:00+5:30
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी ज्या प्रकारे राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्याच ...

धान पिकाच्या भरपाईची मागणी
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी ज्या प्रकारे राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्याच प्रकारे जिल्हा पातळीवरही मोठ्या प्रमाणात कडक निर्बंध वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनंतर पहिल्याच दिवशी शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. सकाळच्या वेळी तर शहरातील बाजारपेठा व सर्वत्र गर्दीच गर्दी असे चित्र दिसून आले.
तालुकानिर्मितीसाठी दोन दशकांपासून संघर्ष
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून केशोरी या गावाची जिल्ह्यात ओळख आहे. तालुकानिर्मितीसाठी आवश्यक असलेला परिसर व लोकसंख्या तथा भौगोलिक परिस्थिती तालुकानिर्मितीच्या निकषाची पूर्तता करीत आहे. यामुळे तालुकानिर्मिती व्हावी, यासाठी गेल्या दोन दशकांपासून सतत तालुकानिर्मिती संघर्ष समितीचा शासनाकडे लढा सुरू आहे; परंतु जे शासन सत्तेवर येते, ते आश्वासनाच्या लालीपॉपशिवाय काहीच देत नाही. यामुळे या भागातील नागरिक शासनाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
अधिकाऱ्यांकडून गावागावांत जनजागृती
साखरीटोला : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना, नागरिकांकडून कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत, खुद्द तालुका अधिकाऱ्यांकडून गावांमध्ये भोंगा वाजवून जनजागृती केली जात आहे. याला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकही स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत.
प्रवासी निवारा उभारा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते, पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीशी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांचा समावेश येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. करिता प्रवासी निवाऱ्याची मागणी आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
गोरेगाव : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने, याचा गोरगरिबांना फटका बसतो.
अल्पखर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी
अर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहे.
दुग्ध भेसळीच्या चौकशीची मागणी
सौंदड : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. चौकशी करण्याची मागणी आहे.
आरोग्यसेवेकडे लक्ष देण्याची मागणी
सालेकसा : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने, आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होते.