खरीपासाठी ४४ हजार ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी
By Admin | Updated: April 29, 2016 01:52 IST2016-04-29T01:52:51+5:302016-04-29T01:52:51+5:30
येणाऱ्या नवीन खरीप हंगामात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

खरीपासाठी ४४ हजार ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी
महाबीजकडून सर्वाधिक आवंटन : ६० हजार ७०० मे.टन खत मिळणार
गोंदिया : येणाऱ्या नवीन खरीप हंगामात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग उत्साहाने या हंगामाच्या तयारीला लागला आहे. यावर्षी खरीपातील धानाचे क्षेत्र थोडे वाढणार असल्याने त्यादृष्टीने कृषी विभागाने बियाणे आणि रासायनिक खतांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात १.९० लाख हेक्टर क्षेत्रासाठी ४४ हजार ३५० क्विंटल बियाणे मंजूर करण्यात आले आहेत.
२०१६-१७ च्या खरीप हंगामाच्या मागणीनुसार महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल तर खासगी कंपन्यांचे १४ हजार ५० क्विंटल बियाणे आवंटित करण्यात आले आहे. सर्वाधिक ७३५० क्विंटल बियाणे गोंदिया तालुक्यात तर सर्वात कमी ३ हजार क्विंंटल बियाणे सालेकसा तालुक्यात मंजूर करण्यात आले आहे.
खरीप हंगामा २०१६ साठी ६० हजार मे.टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने नोंदविली. प्रत्यक्षात ६० हजार ७०० मे.टन आवंटन मंजूर झाले. १ एप्रिल रोजीच्या नोंदीनुसार ८ हजार ५५७.२० मे.टन रासायनिक खत आणि १ हजार ११४.८० मे.टन मिश्र खताचा साठा शिल्लक आहे. नवीन हंगामासाठी मंजूर रासायनिक खतांमध्ये युनिया २५ हजार ३०० मे.टन, डिएपी २८०० मे.टन, एमओपी २५०० मे.टन,, एसएसपी १८८ मे.टन, एकूण संयुक्त खते ११ हजार ८०० मे.टन असे एकूण ६० हजार ७०० मे.टन आवंटन मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. (जिल्हा प्रतिनिधी)