संस्थेत प्रसूतीचे प्रमाण आले ९९ टक्क्यांवर

By Admin | Updated: September 18, 2015 01:36 IST2015-09-18T01:36:51+5:302015-09-18T01:36:51+5:30

नक्षल प्रभावित, दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेने आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे या योजनांचे लाभार्थी वाढले आहेत.

The delivery was 99% in the organization | संस्थेत प्रसूतीचे प्रमाण आले ९९ टक्क्यांवर

संस्थेत प्रसूतीचे प्रमाण आले ९९ टक्क्यांवर

आरोग्याच्या योजनांचे यश : १२ हजार गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ
गोंदिया : नक्षल प्रभावित, दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेने आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे या योजनांचे लाभार्थी वाढले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण होण्यास मदत झाली आहे. नऊ वर्षाच्या कालावधीत आरोग्य सेवेत मोठा बदल झाला असून अनेक योजना लोकाभिमुख झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना घेता आला आहे.
जननी सुरक्षा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातेला संस्थेत प्रसुती केल्यानंतर ७०० रुपये व शहरी भागातील मातेला ६०० रुपये, मातृत्व अनुदान योजनेंतर्गत संस्थेतील प्रसुतीनंतर ४०० रुपये, प्रत्येक मातेला प्रसुतीकाळात ३ दिवस मोफत जेवण, जोखमीच्या मातांना विनामुल्य वाहन व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात आल्यामुळे जवळपास १०० टक्के प्रसुती या आरोग्य संस्थेत झाल्या आहेत.
सन २०१४-१५ या वर्षात १६ हजार ५२६ प्रसुती या संस्थेत झाल्या असून त्यापैकी १३ हजार ८४० गरोदर मातांना घरापासून संस्थेत मोफत सेवा देण्यात आल्या आहे. मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गर्भवती मातांची, स्तनदा मातांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालकांची तपासणी करून १२ हजार ५९ गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१४-१५ या वर्षात मानव विकास मिशनअंतर्गत ४५५ आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रात विविध आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नऊ वर्षात आमुलाग्र बदल
सन २००५-२००६ या वर्षात आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ३९.१८ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ७५.०२ टक्के, प्राथमिक लसीकरण ९५.६५ टक्के, अर्भक मृत्यू दर ४०.७२ टक्के, प्रजनन दर २.५३ टक्के असा होता. सन २०१४-१५ या वर्षात आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ९९.६४ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ९४.७४ टक्के, प्राथमिक लसीकरण १०० टक्के, अर्भक मृत्यू दर २४.७२ दरहजारी, प्रजनन दर २.०५ दरहजारी असा झाला आहे.
जीवनदायी योजनेत ६ हजार २४९ रुग्णांची नोंदणी
२१ नोव्हेंबर २०१३ पासून जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ६ हजार २४९ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. या योजनेंतर्गत त्यांच्या उपचारावर १ कोटी १५ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. वास्तविक जिल्ह्याच्या १३ लाख लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची ही नोंदणी कमीच असून ती वाढविण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. योजनेच्या प्रचार व प्रसारात हा विभाग कमी पडत असल्याचे दिसून येते.

Web Title: The delivery was 99% in the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.