देवरीत एसटी आगाराची मागणी

By Admin | Updated: November 19, 2014 22:43 IST2014-11-19T22:43:36+5:302014-11-19T22:43:36+5:30

देवरीचे बसस्थानक तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रातील प्रमुख बसस्थानक आहे. या बसस्थानकाचा शुभारंभ १९ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. या स्थानकावर सकाळ ते रात्रीपर्यंत दररोज शेकडोंच्या संख्येत

Delivered ST demand demand | देवरीत एसटी आगाराची मागणी

देवरीत एसटी आगाराची मागणी

देवरी : देवरीचे बसस्थानक तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रातील प्रमुख बसस्थानक आहे. या बसस्थानकाचा शुभारंभ १९ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. या स्थानकावर सकाळ ते रात्रीपर्यंत दररोज शेकडोंच्या संख्येत बसेसची ये-जा नागपूर, रायपूर, गोंदिया, गडचिरोली आदी ठिकाणी चारही दिशेकडे होते. परंतु देवरी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार नसल्यामुळे बसेसचे संचालय योग्यरीत्या होत नाही.
देवरी तालुका महाराष्ट्र राज्याच्या अंतिम टोकावर असून छत्तीसगड राज्याच्या सिमेवर वसलेला आहे. परंतु आजपर्यंत देवरी येथे राज्य परिवहन महामंडळाचे आगार स्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे बसेसचे संचालन करण्यात मोठ्या समस्या निर्माण होतात. या प्रकारामुळे नागरिकांना बस सुविधांचा लाभ योग्यरीत्या मिळत नाही. देवरी तालुका संपूर्णपणे आदिवासी तालुका आहे. आदिवासींच्या विकासासाठी शासनाव्दारे कोटी रूपयांच्या अनेक योजना राबविल्या जातात. परंतु आजपर्यंत देवरी तालुक्यात एसटी बसेसचे संचालन नियमित व व्यवस्थितपणे केले जात नाही. याचे कारण म्हणजे देवरीमध्ये आगाराची सोय नाही.
बससुविधांच्या अभावामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. देवरी येथे उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस मुख्यालय, आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे कार्यालय, विविध शैक्षणिक संस्था असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना देवरी येथे नेहमी यावे लागते. परंतु बसेसच्या अभावामुळे त्यांना ये-जा करण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते. जर देवरी येथे आगार उघडण्यात आले तर संपूर्ण तालुक्यात व्यवस्थितपणे बसेसचे संचालन होऊ शकेल. तसेच संपूर्ण आदिवासी तालुक्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी उत्तम सुविधा मिळेल.
आता तालुक्यातील जनतेचे लक्ष आ. संजय पुराम यांच्याकडे लागले आहे. ते या आदिवासी तालुक्यात एसटीचे आगार त्वरीत मंजूर करवून घेण्यासाठी प्रयत्न करतील, अशी तालुकावासीयांची अपेक्षा आहे.

Web Title: Delivered ST demand demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.