रस्त्यांवरील दारू दुकाने हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:53 IST2017-03-20T00:53:44+5:302017-03-20T00:53:44+5:30

तालुका मुख्यालयासह इतर गावांमध्ये विविध ठिकाणी नियमित रहदारी असलेल्या रस्त्यांवर वैध-अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू आहेत.

Delete liquor shops on roads | रस्त्यांवरील दारू दुकाने हटवा

रस्त्यांवरील दारू दुकाने हटवा

महिला संघटनांचा पुढाकार : रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांची कोंडी
सालेकसा : तालुका मुख्यालयासह इतर गावांमध्ये विविध ठिकाणी नियमित रहदारी असलेल्या रस्त्यांवर वैध-अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू आहेत. मद्यपी लोक भर रस्त्यावर असभ्य वर्तणूक करीत असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला व मुलींची मोठीच कोंडी होत आहे. त्या रस्त्यांवरून जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या बाबी लक्षात घेऊन रस्त्यांवरील सर्व दारूची दुकाने बंद करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ बहुजन क्रांतिकारी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सालेकसा येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेचे संस्थापक कैलाश गजभिये व महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष किरण मोरे यांनी सांगितले की, सालेकसा येथील रेल्वे स्थानकाकडे जाताना भर रस्त्यावर दारूची दुकाने सुरू असून त्या ठिकाणी मद्यपींचा जमावडा दिसून येतो. अनेक मद्यपी दारूच्या नशेत भर रस्त्यावर उभे राहतात व अश्लील चाळे करतात. एवढेच नव्हे तर रस्त्यावर उभे राहून मद्यपान केल्यानंतर मांसाहारसुद्धा रस्त्यालगतच करतात व असभ्य भाषेचा वापर करतात.
अशावेळी त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. विशेषकरून महिलांना त्या रस्त्यावरून सांभाळून चालावे लागते. याच मार्गावरून शाळकरी मुले व कॉलेजच्या मुलीसुद्धा ये-जा करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील सर्व प्रवासी महिला, इतर शहरात जावून शिक्षण घेणाऱ्या मुली व अनेक महिला कर्मचारीसुद्धा याच रस्त्यावरून ये-जा करतात. परंतु या रस्त्यावर दारूची दुकान व मद्यपींचा जमावडा प्रत्येकाला अस्वस्थ करणारा वाटतो. यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही.
अशात विदर्भ बहुजन क्रांतिकारी विद्यार्थी व महिला संघटनेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून बैठक बोलाविली. तसेच प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून सालेकसासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी रस्त्यावर चालणारी दारूची दुकाने बंद पाडण्यात यावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक कैलाश गजभिये, जिल्हा महिला अध्यक्ष किरण मोरे, दिपाली बारसे, ममता चुटे, कांचन गोल्लीवार, यशवंत शेंडे, अमित वैद्य, नागेश मेश्राम, साहील मोरे, राकेश हुकरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोरात
सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. गावातील महिलांना या अवैध दारू दकानांचा विपरित परिणाम भोगावा लागत आहे. काही ठिकाणी तर भर गावात आणि काही ठिकाणी शाळा-कॉलेज परिसरात अवैध दारू विक्री केली जात आहे. हे सर्व प्रकार त्या क्षेत्रातील जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप महिला मंडळातर्फे करण्यात आला आहे. या अवैध दारू विक्रीला पोलिसांची मूकसंमती तर नाही, असा संशयसुद्धा व्यक्त केला जात आहे. या प्रकारावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.
 

Web Title: Delete liquor shops on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.