अतिक्रमण हटवा, अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: June 4, 2015 00:59 IST2015-06-04T00:59:32+5:302015-06-04T00:59:32+5:30
येथील ग्रा.पं.च्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला एसडीओ यांनी स्थगिती दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अतिक्रमण हटवा, अन्यथा आंदोलन
गावकऱ्यांचा इशारा : पाठराखण होत असल्याचा आरोप
कालीमाटी : येथील ग्रा.पं.च्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला एसडीओ यांनी स्थगिती दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एक वर्षापूर्वी गावातील स्मारक समितीने रात्रीच्या वेळेस स्मारकाकरीता सिमेंटचा चबुतरा तयार केला. त्यामुळे गावात संतापाची लाट पसरु लागली. याप्रकरणी स्मारक समितीने स्मारक उभारण्यासंदर्भात शासनाची परवानगी घेतली नसून अवैध मार्गातून बांधकाम केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. सदर जागा रस्त्यासाठी आहे.
भविष्यात स्मारकामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि गावात शांतता व सुव्यवस्था असावी या उद्देशाने गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. याविषयी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दखल घेत तहसील कार्यालयामार्फत ग्रा.पं. कालीमाटीला सदर अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
तहसीलदार शक्करवार यांच्या आदेशान्वये ग्रा.पं.ने रितसर कार्यवाही करुन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात शासकीय यंत्रणांचा पाचारण केले. १ जून रोजी कारवाई सुरु करण्यात आली, पण या ठिकाणी गावकरी व समितीच्या बाहेर गावावरून आलेल्या शेकडो लोकांची गर्दी झाली.
यावेळी एसडीओ सूर्यवंशी यांनी ग्रा.पं. भवनात समिती व ग्रा.पं. पदाधिकारी यांची बैठक घेवून अखेर अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला स्थगिती दिली. या निर्णयाबाबत गावकऱ्यांनी शंकाकुशंका व्यक्त केली.
अधिकारी, मंत्री किंवा वरिष्ठांच्या दबावतंत्राखाली ही स्थगित दिल्याच्या चर्चेला ऊत येत आहे. नायब तहसीलदार वाकचोरे यांच्या माहितीनुसार सहा दिवसानंतर ग्रा.पं. पदाधिकारी एसडीओ, डिवायएसपी, समितीचे अध्यक्ष यांच्यात चर्चा हेणार आहे.
या प्रकरणात अधिकारी पाठराखण तर करीत नाही, अशी शंका काही लोकांनी व्यक्त केली. शासन आदेशान्वये अतिक्रमण काढावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांंनी दिला. (वार्ताहर)
गावातील अतिक्रमण शासन आदेशान्वये समितीच्या अध्यक्ष/सचिव यांना चार वेळा नोटीस बजावल्या पण त्यांनी सदर वादग्रस्त जागा रिकामी केली नाही. म्हणून शासन यंत्रांची मदत घेऊन अतिक्रमण काढण्याचे निर्णय घेण्यात आले. समोरील कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार होणार आहे.
-प्रतिभा गिऱ्हेपुंजे
सरपंच, कालीमाटी.