तहसीलदाराच्या आदेशाची अवहेलना
By Admin | Updated: May 24, 2015 01:39 IST2015-05-24T01:39:32+5:302015-05-24T01:39:32+5:30
तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट नं. १८१ ची माहिती मागीतली.

तहसीलदाराच्या आदेशाची अवहेलना
आमगाव : तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट नं. १८१ ची माहिती मागीतली. त्यात सदर गट नंबरावर कुणाचे अतिक्रमण आहे की सदर गट सरकारी आहे, अशी २६ नोव्हेंबर २०१४ ला माहिती तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना मागीतली. मात्र संबंधीत जागेचे चौकशीनंतर कागद देण्याचे तोंडी आदेश तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी तसेच संबंधित लिपिक यांना दिले. मात्र अजूनपर्यंत तहसिलदाराच्या आदेशाची अवहेलना करुन संबंधित कर्मचाऱ्यांनी कागदपत्र दिले नाही.
धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांची तिन महिन्यापासून कागदाकरिता पायपीट सुरू असून कागद देण्यास टाळाटाळ होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट नंबर १८१ ची माहिती मागीतली. सदर गट टी.सी.एन. नालीच्या आत आहे. यावर कुणाचे अतिक्रमण आहे का? किंवा सरकारी जमीन आहे याबाबत २६ नोव्हेंबर २०१४ ला मागीतली. ही माहिती ४ डिसेंबर २०१४ ला मागीतली. यावर ४ डिसेंबर २०१४ ला अर्जदाराला १८१ गट मध्ये राधेलाल वट्टी धोबीटोला याचे अतिक्रमण नोंद दाखविण्यात आली. तर नकाशा मात्र गट नं. १८६ चा देण्यात आला. या दोन गटाच्या फरकामुळे विसंगती असल्याने अर्जदार रेवा पारधी यांनी दोन्ही माहिती चुकीची आहे असे निदर्शनास आणून दिले. यावर तहसीलदार राजीव शक्करवार यांनी अर्जदाराला अपील करण्याकरिता सांगितले. यावर १० फेब्रुवारी २०१५ ला अपील सादर करण्यात आली. यावर आदेशान्वये मंडळ अधिकारी कोरे व तलाठी मेश्राम यांना मौका चौकशीचे आदेश तहसीलदाराकडून देण्यात आले. यावर सदर जागा तुमच्या मालकीची आहे असे सांगण्यात आले. त्यावर लेखी मागीतले असता मंडळ अधिकारी कोरे यांनी अर्जदाराला अतिक्रमण आहे असे सांगितले. यावर सदर जागा सरकारी आहे असे सांगून लेखीपत्र तहसीलदार मंडळ निरीक्षक किंवा तलाठी यांच्याकडून देण्यात आला नाही. अर्जदार रेवा फुलीचंद पारधी यांनी सदर प्रकरणाची केस नं.२१२ व गट नं. १८१ ची माहिती मागीतली. मात्र तहसील कार्यालयातील समश्रित लिपिकाकडून केसची फाईल दिसत नाही ते गायब झाल्याचे सांगून कागद व माहिती देण्याचे तहसीलदार कार्यालयातील संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. एकंदरित अर्जदाराला मंडळ अधिकारी कोरे, तलाठी मेश्राम हे सत्य माहिती देत नाही. वेगवेगळी माहिती देऊन वेळकाढूपणा करीत आहेत. सदर मंडळ अधिकारी कोरे व तलाठी मेश्रामवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पारधी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)