लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोचेवाही येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित (रजि. क्र. ७२२) या संस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करून ४ हजार ७८४.७२ क्विंटल धानाचा गैरव्यवहार करून शासनाची ९२ लाख ८२ हजार ३५६ रूपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी रावणवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन संस्थेच्या १३ संचालकांविरुद्ध ५ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत गोंदिया तालुक्यातील कोचेवाही संस्थेला धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. यासंदर्भात ३० नोव्हेंबर २०२१ रोजी शासनमान्य अटी व शर्तीचा करार करण्यात आला होता.
या करारानुसार ११५९ शेतकऱ्यांकडून ३२,६२१.०५ क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. ६.३२ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. तथापि, संस्थेने केवळ २७ हजार ८३६.३३ क्विंटल धानच संबंधित मिलर्सकडे सुपूर्द केले. उर्वरित ४,७८४.७२ क्विंटल धान संगनमत करून परस्पर गायब केले आहे.
लेखापरीक्षण अहवालात काय उघड झाले ?कोचेवाही येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत ११५९ शेतकऱ्यांनी ३२ हजार ६२१ क्विंटल धान विकले. संस्थेने खरेदी केलेल्या या धानापैकी २७ हजार ८३६.३३ क्विंटल धान मिलर्सला भरडाईसाठी दिले. तर ४,७८४.७२ क्विंटल धान त्या गोदामात उपलब्ध नव्हते. हे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले. अपहार केलेल्या थानाची किंमत २२ लाख ८२ हजार ३५६.८० रूपये आहे.
आरोपींमध्ये यांचा समावेशविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित (रजि. क्र. ७२२) कोचेवाहीचे अध्यक्ष माधोसिंह धर्मसिंह परिहार, चोखलाल केवल जांभरे, प्रेमलाल धडुजी टेंभरे, कमलचंद धनीराम ढोडरमल, उद्देलाल फतू पाचे, सुरेश नतुभाऊ भक्तवर्ती, रमेश गेंदलाल कावरे, ब्रिजलाल शंकर सोनवाने, कृष्णकुमार आसाराम गजभिये, हुमेंद्र पुरनलाल पटले, देवेंद्र गेंदलाल बागडे, पुस्तकला परसराम परिहार, सुनीता छेदीलाल पाचे हे सर्व आरोपी संस्था संचालक मंडळात सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीत कार्यरत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.