आरोग्य सेवकांची कमतरता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: September 1, 2014 23:42 IST2014-09-01T23:42:10+5:302014-09-01T23:42:10+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकांची कमतरता आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा आरोग्य सेवकांच्या भरतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने

आरोग्य सेवकांची कमतरता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकांची कमतरता आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा आरोग्य सेवकांच्या भरतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांना योग्यरीत्या सेवा मिळत नाही. त्यामुळे पांढरी येथील आरोग्य केंद्रात त्वरीत आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र घाणीचे वातावरण असते. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे परिसरात विविध आजारांचा फैलाव झाला असून प्रत्येक घरी एकतरी रूग्ण आढळून येत आहे. एखाद्या कुटुंबात एक किंवा संपूर्ण कुटूंबच आजारी असल्याचे दिसून येत आहे. मात्र आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना मार्गदर्शन करून त्यांना औषधोपचाराबाबत सल्ला मिळणे आता कठिण झाले आहे.
गोरगरिबाच्या जनतेच्या आरोग्यासाठी शासनाने जिल्ह्यात, तालुक्यात व ग्रामीण भागात रुग्णालयांची सोय केलेली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातूनच औषधोपचार केला जातो. पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या असल्यामुळे येथील आरोग्य सेवा ढेपाळली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात डुंडा, शिवनटोला, पांढरी, बकीटोला, भोयरटोला, गोंगले, मुरपार, सितेपार, मालीजुंगा, रेंगेपार, हलबीटोला आदी गावांचा समावेश होतो. मोठ्या प्रमाणात रुग्ण औषधोपचार करण्याकरिता येथे येतात. दररोज १०० ते १५० रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र त्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रूग्णांना आपला नंबर येण्यासाठी मोठीच प्रतीक्षा करावी लागते. अशा प्रकारची परिस्थिती या आरोग्य केंद्रात आता नेहमीच बघायला मिळत आहे.
सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यात काडीकचरा सडून त्या ठिकाणी किडे व जंतू तयार होवून मानवी जीवनाला गंभीर धोका निर्माण करण्याची दाट शक्यता असते. ताप, सर्दी, विषमज्वर, हिवताप, डेंग्यू, पोटदुखी, हागवण, हत्तीरोग, कावीळ आदी आजार मोठ्या प्रमाणात पसरताना सद्यस्थितीत दिसून येत आहे. या भागात आरोग्य सेवक नसल्यामुळे गावोगावी जावून रुग्णांची भेटी व तपासणी बंद झालेली आहे. या परिसरामध्ये हिवतापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी डी.एन. कुंभरे नामक आरोग्य सेवकाची नियुक्ती केली होती. परंतु नऊ महिन्यांपासून ते गैरहजर असल्याचे सांगण्यात येते. ही बाब प्राथमिक आरोग्य केंद्रातून लक्षात आली. मग अशा कर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? हा चर्चेचा विषय बनलेला आहे. सदर कर्मचाऱ्याने गावोगावी जावून तपासणी केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर आरोग्य सेवकावर कारवाई करून नव्याने आरोग्य सेवकाची नियुक्ती करावी, अशी जनतेची मागणी आता जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)