पर्यावरण असंतुलनामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट

By Admin | Updated: May 15, 2014 23:43 IST2014-05-15T23:43:25+5:302014-05-15T23:43:25+5:30

नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील आढळणार्‍या शेकडो प्रजातींच्या पक्षांपैकी कित्येक

Decrease in number of birds due to environmental imbalances | पर्यावरण असंतुलनामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट

पर्यावरण असंतुलनामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट

गोंदिया : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील आढळणार्‍या शेकडो प्रजातींच्या पक्षांपैकी कित्येक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी डायनासोरप्रमाणे केवळ चित्रातच बघायला मिळतील, अशी भिती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अतिसंवेदनशील वर्गात मोडणार्‍या पक्षांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्रांच्या सहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रयाला आले तर त्यांना पळवू नका. अन्नाचे दोन घास किंवा मूठभर धान्य टाका, नामशेष होण्यार्‍या या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीच्या उबेची गरज आहे, असे आवाहन पक्षीतज्ञांनी केले आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे जागतिक उष्माघाताची समस्या जगापुढे उभी ठाकली आहे. त्याचा परिणाम एकंदरीतच ऋतुचक्रांवर होत आहे. तिन्ही ऋतूंची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कालावधीमध्येही बदल होत आहे.

सामान्यत: विदर्भात आढळणारे चिमणी, कबूतर, साळुंखी आणि स्थलांतरीत भोरड्याच्या जीवनक्रमावर याचा परिणाम होत आहे. साधारणपणे मार्च ते जुलै हा पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल आणि मनुष्याच्या अतिक्रमणामुळे या पक्ष्यांची प्रजनन प्रक्रिया प्रभावित होत असल्याने नव्या पक्ष्यांच्या उत्पन्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विदर्भात पूर्वी मोठय़ा प्रमाणात आढळणार्‍या गिधाड, सारस, माळढोक, रानपिंगळा, हिरवामुनिया आणि स्थलांतरीत पान पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

निसर्गाचा सफाई करणारा अशी भूमिका बजाविणार्‍या गिधाडाच्या तीन जाती विदर्भात आढळत होत्या. परंतु अन्नसाखळीमध्ये आलेला अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. जगभरात त्यांची संख्या चार कोटींवर होती. ती आता ५0 हजारांपेक्षाही खाली असल्याचे एका सर्व्हेक्षणावरून सिध्द झाले आहे. म्हातारी जनावरे कत्तलखान्यात विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे.

जागतिक उष्माघातासोबतच वाढते शहरीकरणही या पक्ष्यांच्या मुळावर घाला घालत आहे. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे तापमानातही वाढ होत आहे. याचा परिणामही पक्ष्यांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे अनेक पक्षी लुप्त होत असून त्यांच्या संवर्धन व संरक्षणाची आता गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Decrease in number of birds due to environmental imbalances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.