धान खरेदीचा निर्णय लवकरच होणार
By Admin | Updated: June 11, 2014 00:07 IST2014-06-11T00:07:05+5:302014-06-11T00:07:05+5:30
जिल्ह्यातील बंद असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रांचा विषय लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधी लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर

धान खरेदीचा निर्णय लवकरच होणार
गोंदिया : जिल्ह्यातील बंद असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रांचा विषय लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधी लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर आता आ.गोपालदास अग्रवाल यांनीही विधानसभेत यावर आवाज उठवला. त्यामुळे धान केंद्र लवकरच सुरू होण्याची आशा बळावली आहे.
जिल्ह्यात उन्हाळी धानाचे क्षेत्र एकीकडे वाढत असताना ऐन धान खरेदीच्या काळात जिल्ह्यातील शासकीय आधारभूत किमतीनुसार खरेदी होणाऱ्या धानाचे केंद्र बंद करण्यात आले. हे धान खरेदी केंद्र सरकारच्या आदेशाने बंद केल्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.
हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारित असल्याचा आरोप भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला होता.
यात शेतकऱ्यांचे नाहक मरण होत असल्यामुळे या विषय लवकर मार्गी लावावा अशी मागणी दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधीतून विधिमंडळ सभागृहात केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता आ.अग्रवाल यांनी या विषयाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
सध्या धान खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दर १३०० रुपये असताना व्यापाऱ्यांना नाईलाजाने ९०० ते १००० रुपये क्विंटल अशा दराने धान विकावे लागत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्यामुळे सध्या शेतकरी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवसात याबाबतचा निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)