आधी मोबदला ठरवा, मगच टॉवर उभारा
By Admin | Updated: April 23, 2017 01:46 IST2017-04-23T01:46:12+5:302017-04-23T01:46:12+5:30
रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे.

आधी मोबदला ठरवा, मगच टॉवर उभारा
शेतकरी झाले आक्रमक : मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेची टॉवर उभारणी वांद्यात
गोंदिया : रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे निश्चित न करताच त्यांच्या शेतजमिनीत टॉवर उभारणी केली जात असल्यामुळे २२ शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रतिटॉवर १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करा, त्यानंतरच काम सुरू करा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आणि वेळप्रसंगी सहकुटुंब आंदोलन करणार, असा इशारा माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे यांच्यासह पीडित शेतकऱ्यांनी शनिवारी दिला.
गोंदियात पत्रपरिषदेत याप्रकरणाची माहिती देताना टेंभरे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले की, मुंडीपार ते हिरडामाली यादरम्यान १५ किलोमीटरच्या अंतरात ६४ विद्युत टॉवरची उभारणी केली जात आहे. रेल्वे लाईनसाठी उभारल्या जात असलेल्या या टॉवरची उभारणी करण्याचे काम महापारेषण कंपनीकडे आहे. त्यांनी ते एका कंत्राटदाराला सोपविले आहे. त्या ६४ टॉवरपैकी २२ टॉवर सरकारी जमिनीत आहेत. उर्वरित ४२ टॉवरपैकी २२ टॉवर ज्या २२ शेतकऱ्यांच्या शेतात उभारले जाणार आहे त्यांनी यासंदर्भात योग्य मोबदला देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महापारेषण कंपनी आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी या कामात अडथळा आणू नये असे निर्देश दिले. तसेच टॉवरचे काम होताच एक महिन्याच्या आत रेल्वे विद्युतीकरण विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला द्यावा, असे निर्देश दि.१७ एप्रिलला दिले.
या पत्रपरिषदेला संजय टेंभरे यांच्यासह रतन बघेले, तुलाराम बिहारी, देवराव फाये, बुधा भगत, श्यामलाल बघेले, प्रल्हाद हरिणखेडे, ओंकार पारधी, गजानन रहांगडाले, रामकुमार हरिणखेडे, चंदन पंधरे, नानुराम बागडे, लिखेंद्र हरिणखेडे, सुनील टेंभरे, सुनील तुरकर, रोषण बोपचे, दिलीप हरिणखेडे, अनिल हरिणखेडे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
नुकसानभरपाई योग्य असावी
एका टॉवरच्या कामात १४ ते १५ डेसीमल जमीन जाते. शिवाय शेतजमिनीत असलेले तेवढ्या जागेवरील पीकही जाते. या टॉवरवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्यामुळे त्याखाली काम करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असते. तरीही योग्य मोबदला मिळाल्यास आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिटॉवर किती मोबदला दिला जाणार, हे आधी स्पष्ट करावे, नंतरच काम सुरू करावे, अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असून तोपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये. अन्यथा सहकुटुंब त्या कामाला विरोध करून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांना दिला.