परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज होणार माफ
By Admin | Updated: May 21, 2015 01:07 IST2015-05-21T01:07:20+5:302015-05-21T01:07:20+5:30
शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत सावकारांना परत करण्यात येणार असून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करण्यात येणार आहे.

परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज होणार माफ
गोंदिया : शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत सावकारांना परत करण्यात येणार असून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करण्यात येणार आहे. त्यासाठी परवानाधारक सावकाराकडून ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी कर्ज घेतले असल्यास ३० जून २०१५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असावा. त्यासाठी रेशनकार्डचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. व्यक्तीने ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांनी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांशी किंवा कर्जदार कुटूंबातील सदस्यासोबत संपर्क साधून त्यांचे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात ३० मे पर्यंत सादर करायचे आहेत.
प्रस्तावासोबत शेतकऱ्यांनी सातबारा व गाव नमुना आठ, शेतकऱ्यांचे हमीपत्र, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड यांच्या छायांकित प्रती सादर कराव्या, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)