अमरचंद ठवरे लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी मोरगाव : प्रसूतीदरम्यान योग्य उपचार वेळीच न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री ८ वाजता घडली. याला कोरंबीटोला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे, डॉ. आर्या वैद्य हेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून बुधवारी (दि. ४) सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गावातील शेकडो महिला, पुरुषांनी ठिय्या आंदोलन करून संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची तसेच मृतक महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करण्याची मागणी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कोरंबीटोला येथील धनराज सुरत नेताम यांची पत्नी वसंता नेताम (३३) ही दुसऱ्यांदा गर्भवती होती. पहिली मुलगी डिंपल तीन वर्षे नऊ महिन्यांची आहे. अचानकपणे वसंताला मंगळवारी प्रसव वेदना सुरू झाल्या. त्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी तिला दाखल करण्यात आले. जननी शिशु सुरक्षा योजना अनुक्रमांक ३६८ वर त्या गरोदर मातेची पीएससीच्या रजिस्टरला नोंद करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत त्या गरोदर मातेला ताटकळत पीएससीमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार केले नाही. वेळ मारून नेऊन त्या गरोदर मातेला तब्बल दहा तास उपचाराविना ठेवल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रकृती धोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पीएससीच्या रुग्णवाहिकेने अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे सात वाजेपर्यंत प्राथमिक उपचार करून त्या गरोदर मातेला गोंदियाला हलविण्यात आले. गोंदियाला नेत असताना रात्री ८ वाजेच्या दरम्यान वाटेतच तिचा मृत्यू झाला. गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक दिली. डॉक्टरला निलंबित करा, अशी मागणी लावून धरली. यानंतर बुधवारी सकाळपासून गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घातला.
परिसरातील गावकऱ्यांचा जमाव गरोदर मातेचा मृत्यू वाटेतच झाल्याची माहिती गावासह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. कोरंबी, मांडवखाल, अरततोंडी, आसोली, बोरी, कोरंबीटोला, खामखुरा, हेटी येथील हजारो महिला पुरुष बुधवारी सकाळी सात वाजेपासून पीएससीच्या आवारात जमा होऊ लागले. संतप्त जमाव काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभारावर रोष व्यक्त केला.
घटनेच्या दिवशी डॉक्टर गैरहजर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे घटनेच्या दिवशी गैरहजर होते, अशी माहिती मिळाली. वरिष्ठांना कोणतीही सूचना न देता ते पीएससीच्या कार्यक्षेत्राबाहेर होते, असे बोलले जाते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या गरोदर मातेच्या प्रसूतीदरम्यान योग्य काळजी न घेतल्याचा आरोप आहे.
कोरंबीत पाच सहा तास तणाव पीएससीला लोकांनी घेराव घातल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. लोकांचा जमाव वाढत असल्याने अतिरिक्त पोलिस जवान बोलाविण्यात आले.
वरिष्ठ अधिकारी होते तळ ठोकून उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी विनोद चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी सुवर्णा कांबळे तळ ठोकून पीएस- सीमध्ये होते. आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
अखेर मागण्या झाल्या मंजूर उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे मागण्या मंजूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. डॉक्टरांवर निलंबनाची कार्यवाही व चौकशी समिती नेमण्यात येऊन, डॉक्टर बारसागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढल्याचे पत्र आंदोलनकर्त्यां- समोर वाचून दाखविण्यात आले. मनुष्यवधाचा गुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दाखल करतील, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकरी शांत झाले.
मागण्या मंजूर, कुटुंबीयांनी स्वीकारला मृतदेह वाटाघाटी करून तसेच डॉ. बारसागडे यांच्या ठिकाणी डॉ. आनंद पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश निघाल्याचे सांगितल्यावर ग्रामस्थ शांत झाले. अखेर सायंकाळी ५:३० वाजता त्या महिलेचा मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारला.