प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह धरणात
By Admin | Updated: March 21, 2017 00:57 IST2017-03-21T00:57:59+5:302017-03-21T00:57:59+5:30
तालुक्यातील आकोटोला येथील ३५ वर्षिय विवाहित महिला गेल्या ५ मार्चला रात्री ८.३० वाजता गावाजवळीलच ...

प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह धरणात
हत्या की आत्महत्या? : प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
गोरेगाव : तालुक्यातील आकोटोला येथील ३५ वर्षिय विवाहित महिला गेल्या ५ मार्चला रात्री ८.३० वाजता गावाजवळीलच घोटनटोली (मोहाडी) येथील पूरण कटरे (४० वर्ष) याच्यासोबत पळून गेल्याची तक्रार तिचा पती गोवर्धन भगत (४०) यांनी ६ मार्चला गोरेगाव पोलीस स्टेशनला केली होती. दरम्यान रविवारी (दि.१९) गावाजवळील कलपाथरी धरणाच्या पाण्यात त्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी प्रियकर पुरण कटरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आकोटोला येथील सदर महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची तक्रार महिलेच्या पतीने केल्यापासून पोलिसांचा तपास सुरू केला. पण दोघांचाही पत्ता लागला नव्हता. १९ मार्च रोजी आकोटोला जवळीलच कलपाथरी धरणाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. गावकऱ्यांनी तिथे गर्दी केली. आकोटोलाचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गोरेगाव ठाण्याचे पो.निरीक्षक सुरेश कदम यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले.
तलावातील मृतदेह घोटनटोली निवासी पुरण कटरे याच्यासोबत पळून गेलेल्या महिलेचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १९ मार्चच्या रात्री ८.३० वाजता पोलिसांनी पुरण कटरेला ताब्यात घेतले.
त्या महिलेची हत्या की आत्महत्या याबाबतची चौकशी पोलीस उपनिरीक्षक नलावडे, गणवीर करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
मृतदेह ४ दिवस पाण्यातच
पाण्यात असलेला मृतदेह काढण्यासाठी ढिवर समाजातील लोकांना बोटीसह पाचारण केले. मृत महिलेच्या अंगावर साडी व फाटलेले ब्लाऊज आढळले. हा मृतदेह ४ ते ५ दिवसापूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मृतदेहाचे मांस, केस गळालेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच डॉक्टरच्या चमूला बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. हा मृतदेह नातेवाईकांनी घेण्यास नकार दिल्याने त्याच ठिकाणी पोलिसांनी अंतिम संस्कार केले.