अभिनयातून घडविले महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरेचे दर्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:57 IST2021-02-28T04:57:02+5:302021-02-28T04:57:02+5:30
तिरोडा : कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस व संत रविदास यांची जयंती संयुक्तरीत्या मेरिटोरियस ...

अभिनयातून घडविले महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरेचे दर्शन ()
तिरोडा : कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस व संत रविदास यांची जयंती संयुक्तरीत्या मेरिटोरियस पब्लिक शाळेत शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवून उपस्थितांची मने वेधून घेतली.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,’ अशा शब्दांत मराठी भाषेचे वैशिष्ट्ये सांगण्यात आले. महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. त्यामुळे मराठी भाषादिनी संतांचे स्मरण करणे अत्यावश्यक ठरते. ही बाब लक्षात घेऊन मेरिटोरियस पब्लिक शाळेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत दर्शनाच्या सादरीकरणाचा नावीन्यपूर्ण प्रयोग साकारला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्यातील अभिनय कला सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास व कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पूजनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुकेश अग्रवाल होते. प्राचार्य तुषार येरपुडे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य तुषार येरपुडे यांनी, मराठी भाषा हृदयाची भाषा आहे, त्यामुळे तिला विसरून चालणार नाही, असे सांगून जगातील प्रगत देशातही मराठी हा विषय शिकविला जातो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. संस्थाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी मराठी भाषेचे आपल्या जीवनातील महत्त्व, महाराष्ट्राला लाभलेली गौरवशाली संत परंपरा व समाज सुधारणेच्या कार्यात संतांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
........
सर्व संतांचे दर्शन एकाच मंचावर
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संस्थाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी मराठी भाषा समृद्ध करणारे व माय मराठीचा गोडवा गाणाऱ्या महाराष्ट्रातील गौरवशाली संत परंपरेचे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकाच मंचावर दर्शन घडवून आणण्याची अभिनव कल्पना साकारली. यात विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे परिचय देत महाराष्ट्रातील महान संतांना मंचावर साकारले. यात संतांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत भागवत धर्माचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर ते भागवत धर्माचा कळस असणारे जगद्गुरू संत तुकाराम, आधुनिक संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्त्री संतांचेही दर्शन घडविण्यात आले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या ‘विठ्ठल-रुक्मिणी’ अभिनयाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.