Dare online gambling grounds | ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड

ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : २.४४ लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत मरारटोली येथील बग्गा कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या कॅसिनो सेंटर मध्ये शहर पोलिसांनी धाड घालून पाच संगणक संच, नऊ व्हिडीओ गेम मशीन, संगणक साहित्य व रोख नऊ हजार ५६० रुपये असा एकूण दोन लाख ४४ हजार ५६० रुपयांचा माल जप्त केला. या संदर्भात रामनगर पोलिसात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया शहरात अवैध धंद्याना ऊत आले त्यामुळे नागरिकांनी निवेदन दिल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालून ही कारवाई केली. शहरातील विद्यार्थी व युवक हे जुगार खेळविणाऱ्या लोकांकडून पैशाने विशिष्ट प्रकारची आयडी विकत घेऊन त्या आयडीवर पैशांच्या प्रमाणात पॉर्इंटस जमा करुन घेऊन ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित होतात.
यामुळे शहरात सुरू असलेल्या या ऑनलाईन जुगारावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक जितेंद्र मेश्राम, हवालदार लिलेंद्र बैस, चितरंजन कोडापे, विनय शेंडे व चालक पंकज खरवडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत मरारटोली येथील बग्गा कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या कॅसिनो सेंटरवर धाड घातली. याप्रसंगी तेथे ऑनलाईन जुगार खेळत असलेल्या राकेश मदनलाल नागफासे (३२), योगेश भुवनलाल बोपचे ( ४३,रा.मरारटोली), मनोज भिवराम उईके (३६, रा. आंबेडकर चौक, कुडवा), अनिलकुमार विजयकुमार जैन (५४,रा. रामनगर), नरेंद्र राठोड (रा. मरारटोली), संजय चौरसीया व अनुभव चौरसिया (रा.सिव्हील लाईन्स) यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पालकांनो आपल्या मुलांचे मोबाईल तपासा
आपला मुलगा आपल्या मोबाईलवरुन जुगार तर खेळत नसेल याची चाचपणी पालकांनी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या लोकांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगाराचे अप्लीकेशन डाऊनलोड तर केले नाही ना याची खात्री करावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Web Title: Dare online gambling grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.