जिल्ह्यावर घोंघावतेय पुन्हा दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 22, 2016 00:09 IST2016-08-22T00:09:37+5:302016-08-22T00:09:37+5:30
यावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी

जिल्ह्यावर घोंघावतेय पुन्हा दुष्काळाचे सावट
पावसाचे प्रमाण कमी : धरण, तलाव यावर्षीही राहणार तहानलेलेच?
संतोष बुकावन अर्जुनी-मोरगाव
यावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी निश्चितपणे दुष्काळाचा सामना करावा लागण्याची बिकट अवस्था दिसत आहे. धान रोप फुटवे अवस्थेत असताना साधारणपणे आॅगस्ट महिन्यात ४३६ मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र त्या तुलनेत ५० टक्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. परंतू हे धरण अर्धेही भरलेले नाही. केवळ ४७.२६ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या तीन वर्षात, म्हमजे ५ सप्टेंबर २०१३ नंतर हे धरण ‘ओव्हरफ्लो’ झालेच नाही. या परिसरातील शेतकरी एकतर निसर्ग किंवा या धरणावर पूर्णपणे अवलंबून आहेत. धरणाची लघुतम पातळी ८१० फूट, उच्चतम ८३८.६० फूट आहे. आजघडीला धरणात ८२७.७० फूट जलसाठा आहे. आगामी काळात खरीपाचे पीक निघण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी सोडावेच लागणार आहे.
एका महिन्याला सिंचनासाठी साधारणत धरणातील ५ फूट पाण्याची गरज भासते. आॅक्टोबर महिन्याअखेरपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाखाली पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणी खर्च होईल. ८१५ फूट हा राखीव पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत असतो. याशिवाय या धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची अर्जुनी-मोरगाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यासाठी ३.०७२ दलघमी पाण्याची आवश्यकता असते. आगामी उर्वरीत नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.
दरवर्षी जिल्ह्यात १३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस होतो. यावर्षीची स्थिती मात्र दयनीय आहे. धरणाच्या पाण्याने खरीप हंगाम कसाबसा निघेल मात्र रबी हंगाम, उन्हाळी पीक, पिण्याचे पाणी, जनावरे, वन्यप्राण्यांसाठी जलसंकट उद्भवण्याची चिन्हे आहेत. सध्या मान्सूनची मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे शिल्लक आहेत. या नक्षत्रात पावसाचे प्रमाण कमी असते. चित्र व स्वाती या नक्षत्रात अनियमित पाऊस होतो. त्यामुळे यंदाचा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता धूसर आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तिरोडा तालुक्यात पावसाचे प्रमाण ९२.९ टक्के असल्याचे दिसते. तिथे गतवर्षी पेक्षा पाऊस जास्त आहे. सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत केवळ ५८.६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत या तालुक्यात १०९ मिमी कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत सरासरीनुसार ९५६.१ मिमी पाऊस हवा होता. मात्र प्रत्यक्षात ६९० मिमी पडला आहे. म्हणजे तब्बल २६६ मिमी पावसाचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सरासरी गाठता आली. मात्र यावर्षी तशी लक्षणे दिसून येत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात गेल्या १९ दिवसात केवळ ८७.८ मिमी पर्जन्यवृष्टी झाली हे विशेष.