रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 01:28 IST2017-03-25T01:28:10+5:302017-03-25T01:28:10+5:30

एस्केलेटरच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने एकीकडे पादचारी पूल तोडला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागू शकतो.

The danger of the life of the railway passengers | रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात

रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात

गोंदिया स्थानक : एस्केलेटरच्या कामासाठी पूल तोडल्याने फजिती
गोंदिया : एस्केलेटरच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने एकीकडे पादचारी पूल तोडला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे होम प्लॅटफार्म (क्रमांक १) वगळता सर्व प्लॅटफार्मवर जाण्यासाठी प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ पार करावे लागत आहेत.
दुसरीकडे रेल्वे स्थानकाच्या प्रभू रोड व मेन रोडकडील मालवाहू वाहनांच्या रस्त्याचे प्रवेशद्वार मागील अनेक दिवसांपासून बंदच ठेवले जात आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी लांब अंतर चालण्याची मोठीच कसरत करावी लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने मागील आठवड्यात या मालवाहू प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटविले. त्यामुळे गेटसमोरील जागा खुली झाली व रस्ता मोठा मोठा झाला. तसेच होमप्लॅटफॉर्मवरून प्लॅटफॉर्म- ३, ४, ५ व ६ वर जाण्यासाठी जुने पादचारी पूल होते. त्यामुळे सर्वच फलाटांवर प्रवाशांना ये-जा करणे सुलभ होते. आता लिफ्ट व एस्केलेटरच्या कामासाठी सदर पुलाचा प्लॅटफॉर्म-१ ते ३ व ४ पर्यंतचा भाग तोडण्यात आला व नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे येथून प्रवाशांची ये-जा बंद झाली. पण यानंतर प्रवाशांनी जवळचा मार्ग म्हणून मालवाहू रस्त्याने जावून मालवाहू प्रवेशाद्वारातून स्थानकाबाहेर निघणे सुरू केले. तर रेल्वे प्रशासनाने मालवाहू रस्त्याच्या प्रवेशद्वारच प्रवाशांसाठी बंद केला.
केवळ माल स्थानकाच्या आत आणतेवेळी व स्थानकातून बाहेर नेतेवेळीचे हे गेट सुरू केले जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्म-७, ६ व ५ वरून प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते. प्लॅटफॉर्म- ५ व ६ वरून आधी प्रवाशांना प्लॅटफॉर्म-३ व ४ वर पुलाने यावे लागते. त्यानंतर पायदळ मालवाहू रस्त्याने होम प्लॅटफार्मपर्यंत यावे लागते. मालवाहू रस्त्याचे प्रवेशद्वार बंद असल्याने प्रवाशांना बाजार परिसराकडील मुख्य प्रवेशद्वाराकडे जावून मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागते. या सर्व प्रकाराला अर्ध्यापेक्षा जास्त तासाचा कालावधी लागतो.
शिवाय हे गेट बंद राहत असल्याने अनेक खोडकर प्रवासी या बंद गेटवर चढून उडी मारून स्थानकाबाहेर पडतात. या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांनी एस्कलेटर व लिफ्टचे काम पूर्ण होईपर्यंत मालवाहू रस्त्याचे प्रवेशद्वार प्रवाशांसाठी सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
याबाबत गोंदिया रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मालवाहू रस्त्याच्या प्रवेशद्वारातून केवळ माल आणणे व नेणे यासाठीच परवानगी आहे. त्यामुळे इतर वेळी ते गेट बंद असते. इमर्जंसीच्या वेळी ते उघडले जाते.
बॅटरी आॅपरेटेड कारसुद्धा मालवाहू रस्त्यावरून नेण्यास परवानगी मिळाली नव्हती. परंतु ज्येष्ट व वृद्ध नागरिकांच्या सोयीसाठी ती परवानगी देण्यात आली. मालवाहू रस्त्यांवरून प्रवासी जावू नये व अपघात घडू नये, यासाठी हे गेट बंद ठेवले जाते, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The danger of the life of the railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.