‘जंक फूड’चे प्रस्थ धोक्याचे
By Admin | Updated: June 3, 2015 01:18 IST2015-06-03T01:18:33+5:302015-06-03T01:18:33+5:30
पारंपरिक आहाराला मागे सोडत काहीतरी वेगळे खाण्याच्या नादात लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

‘जंक फूड’चे प्रस्थ धोक्याचे
गोंदिया : पारंपरिक आहाराला मागे सोडत काहीतरी वेगळे खाण्याच्या नादात लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आज विवाह समारंभात चायनीज पदार्थ असलेल्या स्टॉलवर गर्दी पहायला मिळते. महानगरात असलेले हे फॅड आता ग्रामीण भागापर्यंत पोहचले असल्याचे दिसते.
विद्यार्थी शाळेत आणत असलेल्या डब्यातही जंक फूड देण्याचा आग्रह पालकांकडे करीत असल्याची तक्र ार ऐकायला मिळते. परंतु हे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. या पदार्थांचे सेवन केल्याने मुलांची शारीरिक वाढही खुंटते. याला आळा घालण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बर्गर, मॅगी, न्यूडल्स, पिझ्झा, चिज, चिप्स असे जंक फूड डब्यात देऊ नये, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या जंक फूडमध्ये रसायनांमुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. यामध्ये असलेल्या मसाल्यांमुळे अॅसीडीटी होणे, पोट दुखणे, चिडचिड होणे असे प्रकार वाढीस लागत असल्याचे वैद्यकीय संशोधन अहवालात नमुद केले आहे.
शाळेतही पाल्यांना याप्रकारचे पदार्थ डब्यात देऊ नये अशा सूचना पालकांना दिल्या जात आहे. मात्र मुलांच्या आग्रहास्तव जंक फूड डब्यात असतेच. शहरातही जंक फूड पदार्थांची विक्री होत असलेल्या दुकांनामध्ये गर्दी पहायला मिळते. पूर्वी चाटची दुकाने व ठोले बघावयास मिळत होते. आता मात्र जंक फुड कॉर्नर त्यांची जागा घेत आहे. विशेष म्हणजे या दुकानांत तरूण मुले-मुलीच काय महिलांचीही चांगलीच गर्दी दिसून येते. यावरून या पदार्थांची क्र ेझ लक्षात येते. आज एखाद्या चिमुकल्याला गुपचूप विचारल्यास त्याला ओळखता येणार नाही. मात्र पिझ्झा व नूडल्स अलगद ओळखणार अशी स्थिती आहे. यामुळेच अनेक घरातील महिला मंडळी आपल्या बालकांना त्यांचे आवडते जंक फूड डब्याला देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातले हे पदार्थ आता ग्रामीण भागात पोहचले आहेत. त्यामुळे एखाद्या गावातील व्यक्तीला पिझ्झा व नूडल्स खाताना बघितल्यास आश्चर्य वाटायला नको. (शहर प्रतिनिधी)