सव्वा कोटींची नुकसानभरपाई
By Admin | Updated: July 29, 2015 01:18 IST2015-07-29T01:18:08+5:302015-07-29T01:18:08+5:30
पिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे.

सव्वा कोटींची नुकसानभरपाई
वन्य प्राण्यांचा उपद्रव : रोही व रानडुकरांच्या शिकारीबाबत सुधारित सूचना
देवानंद शहारे गोंदिया
पिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्यांच्या शिकारीला राज्य शासनाने आदेश काढून स्वीकृती दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी किती पिकांचे नुकसान केले, त्यांच्या हल्लात किती मनुष्य जखमी व कितींचा मृत्यू झाला व या सर्व प्रकरणांत किती नुकसानभरपाई देण्यात आली याची माहिती लोकमतने मिळविली. मागील दोन वर्षांत पीक नुकसान, मनुष्य मृत, जखमी व पशूधन हानी यांच्या नुकसानभरपाईवर वन विभागाने जवळपास सव्वा कोटी रूपये नुकसानभरपाई दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ जून २०१५ च्या नवव्या बैठकीत रोही व रानडुकर प्राण्यांच्या शिकारीबाबत चर्चा करून सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या. पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकरे व रोही यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलण्याबाबत आदेश जाहीर केले आहे. या आदेशान्वये सदर दोन्ही जनावरांची शिकार करण्यासाठी शेतकऱ्यांना परवाना दिला जाईल. परंतु पीक नुकसानीची घटना होताच २४ तासांच्या आत संबंधित वनपालाकडे याची तक्रार करून पावती घेणे आवश्यक आहे. २४ तासांच्या आत परवाना दिला नाही तर अर्जदाराला परवाना दिल्याचे गृहीत धरून शिकारीची मूभा राहणार आहे.
याबाबत गोंदिया वनविभागाचे सहायक उपवन संरक्षक जी. उदापुरे यांनी सांगितले की, सदर आदेशात केवळ रोही प्राण्याला समावेश करण्यात आले आहे. शिकार करण्याचा परवाना यापूर्वी दिला जात नव्हता. परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना नुकसान भरपाई पूर्वीपासूनच दिली जात होती.
वन विभाग गोंदियातून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१३ ते ३० जून २०१५ पर्यंत एकूण एक कोटी २२ लाख ११ हजार ७५८ रूपयांची नुकसान भरपाई गोंदिया वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे. यात सन २०१३-१४ मध्ये ३९ लाख ५६ हजार ९५० रूपये, सन २०१४-१५ मध्ये ४३ लाख ४६ हजार ६२६ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर सन २०१५ च्या एप्रिल ते जूनपर्यंत केवळ तीन महिन्यांत ३९ लाख आठ हजार १८२ रूपयांनी नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. यात पीक नुकसान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू व जखमी मनुष्य याशिवाय पशूधन हानीचा समावेश आहे.
प्राण्यांच्या हल्ल्यात जखमींची ५१ प्रकरणे
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ५१ प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. यात १७ लाख ४३ हजार ४९७ रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. किरकोळ जखमीसाठी १५ हजार रूपये दिले जातत. जखमींचा उपचार शासकीय रूग्णालयात करावे, असे नमूद आहे. परंतु जखमींची स्थिती गंभीर असेल तर त्याला खासगी रूग्णालयात औषधोपचारासाठी नेले जावू शकते. तसेच ३० मार्च २०१३ च्या शासन आदेशानुसार गंभीर जखमी व्यक्तीला एक लाख रूपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते.
पशुधन हानीची ७७ प्रकरणे दाखल
वन विभागाने पशुधन हानीची ७७ प्रकरणे नोंद केली आहेत. या प्रकरणांमध्ये वन विभागाने सात लाख ३२ हजार ९६९ रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ही कार्यवाही वर्षभर सुरूच असते.