पाटबंधारे उपविभागाची वीज कापली
By Admin | Updated: July 21, 2016 01:15 IST2016-07-21T01:15:09+5:302016-07-21T01:15:09+5:30
लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा या कार्यालयाची विद्युत जोडणी मागील आठवड्यात कापण्यात आली.

पाटबंधारे उपविभागाची वीज कापली
कंत्राटदारांचे देयके रखडले : भंडारा लघु पाटबंधारे विभागातील प्रकार, आठ दिवसांपासून अंधारात
भंडारा : लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा या कार्यालयाची विद्युत जोडणी मागील आठवड्यात कापण्यात आली. आज आठ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही विद्युत जोडणी पुर्ववत करण्यात आली नाही. यामुळे या कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांचे लाखोंचे देयके रखडल्याची बाब समोर आली आहे.
जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्थ असलेल्या भंडारा लघु पाटबंधारे उपविभागाचे कार्यालय जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्याशेजारी आहे. या कार्यालयात स्वत:चे विद्युत मिटर नाही. मागील अनेक वर्षांपासून या कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र विद्युत पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत नव्हता. त्यामुळे येथील उपविभागीय अभियंता यांनी शासकीय कामांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी लगतच्या डिआरडीए विभागाकडून काही दिवसांपूर्वी वीज जोडणी घेतली होती.
सुमारे महिनाभरापूर्वी डीआरडीएने या कार्यालयाला विद्युत जोडणी करून तात्पुरता वीज पुरवठा सुरु केला होता. मात्र या विभागानेही १३ जुलैला कुठलीही पूर्व सूचना न देता या उपविभागीय कार्यालयाला करण्यात आलेला विद्युत पुरवठा अचानकपणे खंडीत केला. यामुळे मागील आठवडाभरापासून या कार्यालयात वीज जोडणीअभावी महत्वाची शासकीय कामे रखडली आहेत. कार्यालयाला सुरु असलेला विद्युत पुरवठा अचानकपणे बंद करण्यात आला.
दुसरीकडे शुक्रवारपासुन लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन उभारले आहे. यात लघु पाटबंधारे उपविभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. यामुळे या विभागाचे कामकाज पुर्णपणे ठप्प झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवाराची महत्वाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
मात्र याबाबत आता विद्युत जोडणी होईपर्यंत या विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती शासनाला देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाची विद्युत जोडणी सुरु केल्यास अडचणी दूर होऊ शकते. (शहर प्रतिनिधी)