अनेक संघटनांकडून दलित हत्याकांडाचा गोंदियात निषेध
By Admin | Updated: November 2, 2014 22:38 IST2014-11-02T22:38:34+5:302014-11-02T22:38:34+5:30
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी जामखेड येथील एका दलित कुटुंबाची हत्या करण्यात आली. दलित पती संजय जाधव (४५), पत्नी जयश्री संजय जाधव व १९ वर्षीय मुलगा सुनील जाधव यांची

अनेक संघटनांकडून दलित हत्याकांडाचा गोंदियात निषेध
गोंदिया : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी जामखेड येथील एका दलित कुटुंबाची हत्या करण्यात आली. दलित पती संजय जाधव (४५), पत्नी जयश्री संजय जाधव व १९ वर्षीय मुलगा सुनील जाधव यांची २० आॅक्टोबर रोजी हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे विहिरीत फेकण्यात आले. या अमानविय घटनेचा निषेध गोंदिया जिल्ह्यातील विविध संघटनांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या या दलित कुटुंबाच्या हत्याकांडानंतर राज्यातील दलित अत्याचाराच्या आणखी चार घटना समोर आल्या आहेत. २१ आॅक्टोबर रोजी पारनेरमध्ये पारधी समाजातील दोघांची हत्या, २१ आॅक्टोबर रोजी परळीत बौद्ध युवक सुनील रोडे याची धारदार शस्त्राने हत्या, २१ आॅक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या भीमनगर येथील बौद्ध वस्तीतील निकाळजे कुटुंबावर हल्ला करून तिघांना जखमी करण्यात आले. तर २१ आॅक्टोबर रोजी पाटोदा तालुक्यातील मातंग वस्तीवर झालेल्या दगडफेकीत व जबर मारहानीत चार जन गंभीर जखमी झाले.
या दलितांवरील अत्याचारा निषेध हनवत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करून अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावे व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत अशोक डोंगरे, महेंद्र टेंभेकर, सिद्धार्थ हुमने, नागसेन गजभिये, अनिल हुमने, जय हेडके, मनोज मेश्राम, अर्चना वंजारी, शीला उके, विजय वैद्य, अजय राऊत, किशोर राऊत, मंगला भैसारे, पौर्णिमा नागदेवे, सुरेंद्र खोब्रागडे, चौधरी, राहुल गजभिये, फुलचंद वंजारी, कपूरचंद डोंगरे, के.एस. वासनिक, अर्चना मेश्राम, माधुरी शहारे, हरिदास साखरे, डॉ. डी.बी. डहाट व इतर समाजबांधव उपस्थित होते.
लोकजनशक्ती पार्टी व जिल्हा दलित सेनेतर्फे अॅड. सचिन बन्सोड यांच्या नेतृत्त्वात गोंदियाचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सदर अमानविय घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यास येत्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी दलित सेना प्रमुख ओंकार बन्सोड, प्रवेश सुखदेवे, सुहास देशमुख, रमाशंकर रॉय, निश बन्सोड, अनिल शेंडे, वसीम सिद्दीकी, राजहंस चौरे, जगदीश रहांगडाले, सतीश ब्राह्मणकर, विजय रहांगडाले, सुरेंद्र डहारे, राजेश जिंकार, नितीन मसराम, निकिलेश शर्मा, हेमराज वासनिक, रोहीत घरडे, धोनी मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
गोंदिया पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनेही सदर हत्याकांडाचा निषेध पक्ष कार्यालयात बैठक घेवून करण्यात आला. तसेच प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी व आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास गोंदिया शहरातून निषेध मोर्चा व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू राहूलकर, विनोद मेश्राम, प्रदेश अध्यक्ष प्रा. सतीश बन्सोड, सुरेंद्र महाजन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)