समाधान शिबिरात राजकारण्यांची दांडी

By Admin | Updated: August 30, 2015 01:34 IST2015-08-30T01:34:10+5:302015-08-30T01:34:10+5:30

तालुका प्रशासनातर्फे शनिवारी (दि.२९) महागाव येथे समाधान शिबिर व शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

Dakhi of politicians in the solution camp | समाधान शिबिरात राजकारण्यांची दांडी

समाधान शिबिरात राजकारण्यांची दांडी

प्रोटोकॉलवरून नाराजी : जि.प. सदस्याचे नावच नाही
अर्जुनी मोरगाव : तालुका प्रशासनातर्फे शनिवारी (दि.२९) महागाव येथे समाधान शिबिर व शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पत्रिकेतील मोठ्या राजकीय नेत्यांनी दांडी मारली तर स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना डावलून प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोप करण्यात आला. तालुका प्रशासन मात्र रक्षाबंधनाचा सण, पाऊस असतानाही लोकांनी हजेरी लावली यातच धन्यता मानता आहे.
शनिवारी महागाव येथील शामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयात समाधान शिबिर व शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम पत्रिकेत सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.प्रफुल्ल पटेल, खा.नाना पटोले यांची नावे नमूद आहेत. या कार्यक्रमाला या राजकीय नेत्यांनी दांडी मारली. शेतकरी दिनाचा कार्यक्रम असूनही शेतकऱ्यांचा कळकळा असलेल्या नेत्यांची अनुपस्थिती हा कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय होता. शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेती या विषयावर चर्चा होऊन शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय होईल या आशेने मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी हजर झाले होते. परंतु राजकारण्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची निराशा झाली.
समाधान शिबिर व शेतकरी दिन हे शासकीय कार्यक्रम असूही हा केवळ भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम होता असे पत्रिकेवरून दिसत होते.
कार्यक्रम पत्रिकेत प्रोटोकॉल पाळला नाही. जर शासकीय कार्यक्रम होता तर जि.प. अध्यक्षांचे नाव कार्यक्रमात का नाही? याऊलट जि.प. उपाध्यक्षांचे नाव पत्रिकेत आहे. पं.स.च्या उपसभापतीचे नाव नाही. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून या कार्यक्रमाचा खर्च वसूल करण्यात यावा असा आरोप प्राचार्य यशवंत परशुरामकर यांनी केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी होते. मंचावर जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी आ.दयाराम कापगते, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, नामदेव कापगते, गोंदियाचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर व कार्यकर्ते उपस्थित होते. मंचावरील या मांदियाळीवरुन हा भाजपाचाच कार्यक्रम होता, असे स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनिय म्हणजे महागाव जि.प. क्षेत्राचे जि.प.सदस्य भास्कर आत्राम, पं.स. सदस्य जे.के. काळसर्पे यांचे कार्यक्रम पत्रिकेत नावच नमूद नाही. पत्रिकेतील काही जबाबदार अधिकारी सुद्धा यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळे हे समाधान की असमाधान शिबिर या चर्चा कार्यक्रमस्थळी होत्या. (तालुका प्रतिनिधी)
प्रोटोकॉल पाळला - डहाट
महसूल विभागातर्फे विस्तारित समाधान योजनेंतर्गत कार्यक्रम घेतला जातो. याच कार्यक्रमात शेतकरी दिन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री बडोले यांना अचानक लंडनला जावे लागल्याने ते हजर झाले नाहीत. हा शासकीय कार्यक्रम होता. प्रोटोकॉल पाळला गेला. कार्यक्रम पत्रिकेत जरी काही नावे नसली तरी त्यांना या कार्यक्रमात बोलविण्यात आले होते, अशी माहिती तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी दिली.

Web Title: Dakhi of politicians in the solution camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.