दावणे हत्याप्रकरण आरोपी गणीला जामीन
By Admin | Updated: October 12, 2015 02:05 IST2015-10-12T02:05:37+5:302015-10-12T02:05:37+5:30
श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष धरम दावणेची ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री हत्या करण्यात आली होती.

दावणे हत्याप्रकरण आरोपी गणीला जामीन
गोंदिया : श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष धरम दावणेची ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी गनी खानसह १५ जणांना अटक करण्यात आली होती. आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीने जामीनासाठी अर्ज केले होते. विचाराधीन अर्जावर सुनावणी करुन मुख्य आरोपी जुल्फीकार ऊर्फ गनी खानला उच्च न्यायालयाने प्रत्येकी एक लाख अशा असे दोन जमानतदारांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. यामुळे गनी खान आता कारागृहातून बाहेर आला आहे.
धरम दावणे हत्या प्रकरणात १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यातील १४ आरोपींची न्यायालयाने जामीनावर सुटका केली. मात्र मुख्य आरोपी जुल्फीकार ऊर्फ गनी खान याच्या जामीन अर्जाला जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यामुळे आरोपी गनी खानने उच्च न्यायालयात जामीनाचा अर्ज लावला. ३० सप्टेंबर २०१५ रोजी न्यायाधीश बी.एम. देशपांडे यांच्या न्यायालयात आरोपीचे वकील आर.एम. डागा व सरकार पक्षाचे वकील ए.ए. गुप्ता व सोनक यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, न्यायालयाने २ लाखांच्या मुचलक्यावर आरोपी गनी खानचा जामीन मंजूर केला. तसेच आरोपीला आठवड्यातून दोन दिवस रामनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे हत्या प्रकरणातील साक्षदारांना कसल्याही प्रकारच्या धमकावणी सारखे प्रकरण घडू नये, अन्यथा जामीन रद्द करण्यात येईल, अशी सुचना न्यायालयाने आरोपीला केली आहे. (तालुका प्रतिनिधी)