एटीव्हीएमद्वारे दररोज २० हजारांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 01:27 IST2016-07-20T01:27:29+5:302016-07-20T01:27:29+5:30

तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग

Daily 20,000 earnings through ATVM | एटीव्हीएमद्वारे दररोज २० हजारांची आवक

एटीव्हीएमद्वारे दररोज २० हजारांची आवक

स्मार्ट कार्डद्वारे तिकीट : लवकरच लागणार क्वॉईन व्हेंडर मशीन
गोंदिया : तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन्स (एटीव्हीएम) लावण्याची मागणी होती. त्यासाठी एकूण आठ मशीन्स प्रस्तावित होत्या. यापैकी सध्या दोन मशिन्स उपलब्ध झाल्या असून त्यांना प्लॅटफॉर्म-१ वर लावण्यात आले. या दोन मशिन्सच्या माध्यमातून दरदिवशी २० हजार रूपयांची आवक होत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोंदिया स्थानकावर सुविधा प्रदान करण्यासाठी नागपूर रेल्वे मंडळाद्वारे १४ जुलै रोजी एटीव्हीएम सुविधेचा शुभारंभ खा.नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ.गोपालदास अग्रवाल, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल, प्रमुख अधिकारी व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रवाशांना नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच गोंदिया स्थानकावर दोन एटीव्हीएमच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा विस्तार लवकरच राजनांदगाव, डोंगरगड, आमगाव, बालाघाट, तिरोडा, तुमसर रोड, भंडारा रोड, कामठी, इतवारी, छिंदवाडा व वडसा स्थानकावरही करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्वरित तिकीट मिळविण्यासाठी या मशीन्स सार्थक ठरतील.
गोंदिया रेल्वे स्थानकातून चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. दरदिवशी २० हजार प्रवाशी रेल्वे गाड्यांत चढतात व एवढेच प्रवाशी येथे उतरतात.
तिकीट घेणाऱ्यांची काऊंटरसमोर लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे अनेकांच्या गाड्या सुटून दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत त्यांना राहावे लागत होते. मात्र आता या मशीन्स लागल्याने तिकीट काऊंटरसमोर लागणाऱ्या प्रवाशांच्या रांगापासून मुक्ती मिळणार आहे. लोकमतने सातत्याने या मशीन्सबाबत पाठपुरावा केला होता हे विशेष.
गोंदिया रेल्वे स्थानकावर लागलेल्या दोन्ही मशीन्स स्मार्ट कार्डद्वारे संचालित होणाऱ्या आहेत. मात्र आता आणखी एक आॅटोमेटिक तिकीट व्हेंडींग मशीन्स गोंदिया स्थानकाला उपलब्ध झाली आहे. ही नवीन मशीन स्मार्ट कार्डद्वारे नव्हे तर सिक्क्यांद्वारे संचालित होणार आहे. त्यामुळे तिला आॅटोमेटिक तिकीट कॉईन व्हेंडींग मशीन म्हटले जाते. ही मशीन रेलटोली भागाकडील रेल्वे स्थानकातील तिकीट बुकींग कार्यालयात लागणार आहे.
प्रस्तावित आठ मशीन्सपैकी तीन मशीन्स स्थानकाला उपलब्ध झाल्या असून पाच मशीन्स आणखी मिळणार आहेत. त्यामुळे तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी होईल. (प्रतिनिधी)

७० रुपयांत स्मार्ट कार्ड
४गोंदिया स्थानकात स्मार्ट कार्ड व त्याला रिचार्ज करण्याची सुविधा बुकिंग आॅफिसच्या काऊंटर क्रमांक ७ मध्ये उपलब्ध आहे. स्मार्ट कार्ड ७० रूपये शुल्क भरून प्राप्त केले जावू शकते. यात ५० रूपये सिक्युरिटी डिपॉझिट व २० रूपयांचा रिचार्ज मिळतो. त्यानंतर केव्हाही २० ते नऊ हजार ५०० रूपयांपर्यंतच्या रकमेचा टापअप केले जावू शकते. एटीव्हीएम स्मार्ट कार्डच्या प्रत्येक रिचार्जवर पाच टक्के बोनस मिळते. तसेच स्मार्ट कार्डची वैधता अंतिम रिचार्जच्या तारखेपासून एका वर्षाची राहणार आहे.

Web Title: Daily 20,000 earnings through ATVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.