जंगलातील अस्वलाची गावात धमाल

By Admin | Updated: October 5, 2016 01:09 IST2016-10-05T01:09:43+5:302016-10-05T01:09:43+5:30

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला या गावात मंगळवारी भल्या पहाटे जंगलातून आलेले एक अस्वल शिरले.

Dahmal in the wild in the forest | जंगलातील अस्वलाची गावात धमाल

जंगलातील अस्वलाची गावात धमाल

कुंभीटोल्यातील प्रकार : वनविभागाने सोडले जंगलात
बाराभाटी : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला या गावात मंगळवारी भल्या पहाटे जंगलातून आलेले एक अस्वल शिरले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आरडाओरड झाल्याने हे अस्वल कैलाश डुंबरे यांच्या पडिक घरात शिरले. ४ तासाच्या कसरतीनंतर वनविभागाने त्याला पिंजऱ्यात टाकून जंगलात नेऊन सोडले.
लगतच्या जंगलातून हे अस्वल येथील कोहमारा ते अर्जुनी मोरगाव या मार्गावर असलेल्या कुंभीटोला या गावात पहाटे ५ वाजताच्या सुमारास शिरले. अस्वल गावकऱ्यांच्या नजरेस पडताच पहाटे एकच गलका सुरू झाला. पाहता पाहता जवळपासच्या गावात आणि संपूर्ण तालुकाभर ही बातमी पसरली. त्यामुळे उत्सुकतेपोटी अनेक लोक कुंभीटोल्यात जमा झाले.
हे अस्वल डुंबरे यांच्या पडिक घरात घुसल्याने कोणतीही हाणी झाली नाही. गावकऱ्यांच्या आरडाओरड्याने ते अस्वल बाहेरही येत नव्हते. नागरिकांनी नवेगावबांध व अर्जुनी-मोरगाव येथील वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर नवेगावबांध परिक्षेत्र कार्यालयाची यंत्रणा सज्ज झाली. अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे पथकही गावात आले.
वनविभागाच्या पथकाने लोखंडी पिंजऱ्यात कसेबसे त्या अस्वलाला कैद केले. त्यानंतर ट्रॅक्टरने त्याला जंगलात नेऊन सोडण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या अस्वलाचे वजन ७० किलो असून ते जवळपास ३ वर्षाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या हे अस्वल नवेगावबांध परिक्षेत्र कार्यालयात नेऊन तेथून व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. कुंभीटोल्यात येण्यापूर्वी या अस्वलाने बोळदे, कवठा, सुकडी, खैरी असा प्रवास केला. यादरम्यान परिसरातील धानपिकाचे नुकसान केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. अस्वलाला पकडण्यासाठी वन यंत्रणेत वन परिक्षेत्राधिकारी विजय मेहर, सी.डी.रहांगडाले बी.एस. सोनवाने, ए.एस.निनावे, मिथुन चव्हाण, विजय येरपुडे, जि.प.सदस्य किशोर तरोणे व गावातील पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.(वार्ताहर)

Web Title: Dahmal in the wild in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.