दादासाहेबांना गोंदियातही आदरांजली
By Admin | Updated: July 26, 2015 02:02 IST2015-07-26T02:02:55+5:302015-07-26T02:02:55+5:30
दलित, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ज्यांचा नावलौकीक होता,..

दादासाहेबांना गोंदियातही आदरांजली
गोंदिया : दलित, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ज्यांचा नावलौकीक होता, असे महाराष्ट्राचे नेते व दोन राज्यांचे राज्यपालपद भूषविणारे रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनामुळे गोंदियातही हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील दिग्गजांनी आणि दलित चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. अनेकांनी त्यांच्याशी झालेल्या भेटीगाठीं सांगितल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी विदर्भातील दीक्षाभूमीच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची एक शाखा म्हणजे गवई होते, असाही सूर दिग्गज नेत्यांच्या तोंडातून ऐकू आला. महाराष्ट्रातील लोकांची गवई यांच्या माध्यमातून झालेली हानी मोठी आहे. ती पोकळी भरुन काढणे अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया गोंदियात उमटल्या.
सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
रा.सू. गवई अतिशय मनमिळावू वृत्तीचे होते. ते काँग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी चांगली दोस्ती होती. ते कधीच सत्येबाहेर राहिले नाही. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमदारांसाठी एक सोसायटी नोंदणी केली होती. त्यातून आमदारांना फ्लॅट देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यापूर्वी आमदारांची अत्यंत गैरसोय होती. आमदारांना सर्व सोयी देण्यात अंतुले व गवई यांचा फार मोठा वाटा आहे. दलित समाजाला संगठीत करून त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली. बाबासाहेबांची एक शाखा म्हणजे गवई तर दुसरी शाखा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. गवई यांनी दीक्षाभूमिचे खूप मोठे काम केले. महाराष्ट्र सरकारने दीक्षाभूमिला मदतही केली. सोसायटीत एक फ्लॅट घेण्याचा मला गवई यांनी आग्रह केला होता. परंतु मी आणि फुंडकर यांनी नकार दिल्यामुळे भाजपने नकार दिलेल्या गोष्टीवर तुम्ही जावू नका नंतर ते लोक फ्लॅट घेतील आणि तुम्ही तसेच राहाल असे गवई यांनी म्हटले होते. नेमके तेच झाले. आदिवासी, हरिजन व मागासवर्गीयांचा नेता हरपल्याने महाराष्ट्राची हाणी झाली. ते राज्यपाल असताना त्यांनी सत्ताधारी पक्षासोबत कधीच वितुष्ट येऊ दिले नाही.
- महादेवराव शिवणकर
माजी वित्तमंत्री
दांडग्या अनुभवाचा संसदपटू गमावला
विद्वान आणि दांडगा अनुभव असलेल्या गवई यांच्या निधनामुळे विदर्भाला सर्वात मोठे नुकसान झाले. दीक्षाभूमि निर्माण करण्यात अग्रणी भूमिका बजावणारे सामान्य कार्यकर्त्यांसाठी काम करणारा आंबेडकरी जनतेचा थोर नेता निघून गेला. विधानसभेतील चांगला संसदपटू म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याकडून मलाही अनेक गोष्टी अनुभवता आल्या अशा नेत्यांमुळे मोठी हाणी झाली.
-गोपालदास अग्रवाल
आमदार, गोंदिया
मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारा नेता
सामाजिक व राजकीय नेतृत्व करणारा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला आहे. यामुळे मागासवर्गीयांची मोठी हाणी झाली.
- दिलीप बन्सोड
माजी आमदार, तिरोडा
अनुभवी व जाणते कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीतून निघून गेले. त्यांच्या अनुभवासारखा दुसरा कुणी नाही. ही पोकळी भरुन निघणार नाही. नवीन फळीने त्यांचे आंदोलन पुढे नेल्यास त्यांना खरी श्रद्धांजली होईल.
-सतीश बन्सोड, रिपाइं पदाधिकारी