करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार
By Admin | Updated: March 10, 2016 02:28 IST2016-03-10T02:28:25+5:302016-03-10T02:28:25+5:30
तिरोडा तालुक्याच्या इंदोरा परिसरात मागील अनेक दिवसांपासून करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. या परिसरात ५ मार्च रोजी झालेल्या शिकारीचा छडा पिटरने लावला ...

करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार
पिटरने लावला रानडुकराचा शोध : वन्यप्राण्यांच्या सहा कवट्या जप्त
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या इंदोरा परिसरात मागील अनेक दिवसांपासून करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. या परिसरात ५ मार्च रोजी झालेल्या शिकारीचा छडा पिटरने लावला असून गोंदियावरुन गेलेल्या चमूने या प्रकरणात वन्यप्राण्यांच्या सहा कवट्या या परिसरातून हस्तगत केल्या आहे. मात्र आरोपीला वन्यकोठडी मिळावी यासाठी तेथील वनपरिक्षेत्राधिकारी चाटी यांनी प्रयत्न न केल्यामुळे अवघ्या ७ तासातच आरोपी जामिनावर सुटला आहे.
इंदोरा परिसरात विद्युतच्या सहाय्याने करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याची गुप्त माहिती उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना मिळाली. या कारवाईत तिरोडा येथील उपवनसंरक्षक एम.के. चाटी आरोपीला सोडून देतील अशी गुप्त माहिती उपवनसंरक्षकांना मिळाल्याने त्यांनी गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम यांना कारवाईसाठी पाठवले. मेश्राम यांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला तिरोडा वनविभागाच्या स्वाधिन केले. परंतु सकाळी ११ वाजता अटक करण्यात आलेल्या आरोपीला अवघ्या ७ तासातच जामिनावर बाहेर येण्याची मुभा मिळाली. यामुळे वनाधिकारी वन्यजीवांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना कसे अभयदान देते याची प्रचिती येते. हे प्रकरण थातूर मातूर दर्शविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच उपवनसंरक्षकांनी ७ मार्च रोजी गोंदिया येथील एक पथक तपासासाठी पाठविले. त्यांच्या सोबत पिटर नावाचा श्वानही पाठवला. या पिटरने शेतकऱ्याने रानडुकराची शिकार करून ज्या शेतात त्याला जमिनीत पुरुन ठेवले होते त्याचा शोध पिटरने लावला. शिकाऱ्याने रानडुकराची शिकार करून त्याला आपल्या शेतात खोलखड्यात पुरले होते. त्यावर लाखोडीचा ढिग तयार केला होता. परंतु पिटरने या प्रकरणाला उजेडात आणले. गोंदिया व तिरोडा येथील २५ ते ३० कर्मचारी, अधिकाऱ्यांनी इंदिरो परिसरातील ३०० हेक्टर वनपरिसर पिंजून काढून त्या परिसरात करंट लावून शिकार करण्यात आलेले वन्यप्राण्यांच्या सहा कवट्या शोधून काढल्या. हरिण, रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांच्या त्या कवट्या असाव्यात असा संशय येत आहे. (तालुका प्रतिनिधी)