दिवाळीच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
By Admin | Updated: October 31, 2015 02:35 IST2015-10-31T02:35:02+5:302015-10-31T02:35:02+5:30
दिवाळी आता जेमतेम १-१२ दिवसांवर येऊन ठेपली असताना दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियावासीयांनी बाजारात गर्दी केली आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
बाजारपेठ हाऊसफुल्ल : कपड्यांच्या खरेदीवर सर्वाधिक उड्या
गोंदिया : दिवाळी आता जेमतेम १-१२ दिवसांवर येऊन ठेपली असताना दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियावासीयांनी बाजारात गर्दी केली आहे. सध्या कपड्यांच्या खरेदीवर सर्वाधिक जोर दिसत असल्याने बाजारातील कापड व्यवसायिकांची दिवाळी आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या गर्दीमुळे बाजारात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही गर्दी अशीच वाढत जाणार आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या सणाला महालक्ष्मी पूजेसाठी नवे वस्त्र परिधान केले जाते. यामुळे नव्या कपड्यांनाही तेवढाच मान असल्याने नवीन कापडांची खरेदी केली जाते. दिवाळीनिमित्त येणारे कापडांचे नवे स्टॉक बघून बाजारात गोंदियाकरांची गर्दी वाढली आहे. आजघडीला दुकानांमध्ये पाय ठेवायला जागा नाही तर रस्त्यांवर गाड्या ठेवायला जागा नसल्याचे दिसून येते. या वाढत्या गर्दीमुळे बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे.
गोंिदयाच्या बाजाराची परिसरासह लगतच्या राज्यांपर्यंत ख्याती असल्याने कापडांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येत नागरिक व व्यापारी गोंदियात येतात. याचा अधिकचा फायदा येथील कापड व्यवसायीकांना मिळतो. गोंदियाच्या बाजारात ६० टक्के कापडांचा व्यापार आहे. यात रेडिमेडचा बोलबाला अधिक प्रमाणात दिसून येतो. विशेष म्हणजे दिवाळीच्या या धामधूमीत जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून यावे या दृष्टीने कापड व्यवसायिकांकडून सेल व ईनामी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
सरकारी नोकरीवाल्यांचीच खरी दिवाळी
वाढत्या महागाईने कळस गाठला आहे. त्यात यंदा पावसाने दगा दिल्याने धान पिक कमी प्रमाणात आले आहे. त्याच धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशात सर्वसामान्य माणसांसह शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. खायचे वांदे असताना दिवाळी कुठून साजरी करायची, असा प्रश्न शेतकरी व सर्वसामान्यांना सतावत आहे. अशात सरकारी नोकरीवर असलेल्यांचीच ही दिवाळी दिसून येत आहे. सरकारी नोकरीत असल्याने मोठा पगारदार वर्ग सध्या खरेदीला लागल्याचे दिसते.
युवा वर्गाची जीन्स-फॉर्मलला पसंती
आजच्या या फॅशनच्या दुनियेत युवा पिढीच्या आवडी निवडीला घेऊन वेगवेगळ््या कंपन्या वेगवेगळ््या प्रकारचे कपडे तयार करीत आहेत. तरूणांची जीन्सला जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. तरूणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच जीन्स घालतात. मात्र कार्यालयीन कामकाजात जीन्स सूट होत नसल्याने युवकांचा कल फॉर्मलकडे दिसतो. जास्त भर रेडीमेड कापडांवर दिला जात आहे. बाजारातील विविध दुकानांत ५०० रूपयांपासून ३००० हजारापर्यंतचे जीन्स उपलब्ध आहेत.