अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही मोहीम मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन स्वतःच्या शेतातील माहिती ई-पीक या ॲपवर अपलोड करावी लागते. या मोहिमेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली; पण अल्प मुदतीमुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी डोकेदुखी ठरत आहे. ही मोहीम थांबवून तलाठ्याद्वारेच नोंदणीची मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ विदर्भ उपाध्यक्ष आशिष कापगते यांनी केली आहे.
या मोहिमेमध्ये अनेक त्रुटी असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना या ॲप्लिकेशनविषयी शासकीय स्तरावरून कुठलेही मार्गदर्शन मिळाले नाही. ग्रामीण भागात मुख्यत्वेकरून इंटरनेट कव्हरेज समस्या कायम आहे. कित्येक ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असते व प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाइल शक्य नाही. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने ते या मोहिमेपासून वंचित आहेत. या समस्यांमुळे अनेक शेतकरी धान विक्री प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांना या प्रक्रियेमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही मोहीम बंद करून शासकीय यंत्रणेद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी कापगते यांनी केली आहे.