धान खरेदीअभावी शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2015 02:45 IST2015-10-31T02:45:41+5:302015-10-31T02:45:41+5:30
खरिपाच्या धानाची कापणी जोमात सुरू असून दिवाळीच्या तोंडावर खरिपाचे धान बाजारात येत आहे.

धान खरेदीअभावी शेतकरी संकटात
ठिकठिकाणी अडचण : रहांगडाले यांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र
तिरोडा : खरिपाच्या धानाची कापणी जोमात सुरू असून दिवाळीच्या तोंडावर खरिपाचे धान बाजारात येत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. करिता कृषी उत्पन्न बाजार समिती व सेवा सहकारी समिती परिसरात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
यावर्षी धानपिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणावर झालेला आहे. जरी उत्पादन जास्त प्रमाणात दिसत असले तरी अनियमित व कमी पावसामुळे धानात दाना न भरल्यामुळे टरफलाचे प्रमाण अधिक आहे. बाजारपेठेत धानाला भाव मिळत नसल्याने कमी दरात शेतकऱ्याला धान विकणे भाग पडत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांकरिता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे अशा आशयाचे पत्र आमदार रहांगडाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले तर शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजारात धानाचे भाव न मिळाल्यास तिथेच असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकणे सोईचे होणार. शिवाय गावोगावी असलेल्या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आधारतूत धान खरेदी केंद्र असल्यास शेतकऱ्यांचा वेळ व वाहतूक खर्च कमी होईल. शेतकऱ्यांचे शोषण थांबविता येईल व योग्यभाव तसेच न्याय मिळेल, असेही आमदार रहांगडाले यांनी या पत्रात सुचविले होते.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री गोंदियाला येऊन गेलेत तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात या पत्राचा आवर्जुन उल्लेख केला व अंमबलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
पांढरी : परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड केली जाते. सध्या हलक्या धानाच्या कापणी व मळणीचे काम सुरू असून बहुतेक शेतकऱ्यांनी कापणी करून पुंजणे रचले आहेत. पण अचानक वातावरण बदलामुळे पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी आपल्याकडील साधन व यंत्रांच्या माध्यमातून मळणी करीत आहेत. परंतु शासनाने या परिसरामध्ये धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना कवळीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. हेच व्यापारी ते धान आधारभूत केंद्र सुरू झाल्यावर अधिक भावात विक्री करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहेत.
या परिसरातील भुमिपुत्र म्हणून ओळखणारे जनप्रतिनिधी सध्या सत्ता हातामध्ये असतानी लुप्त झाले आहेत. आज शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. त्यांच्यासाठी संघर्ष न करता फक्त मतांसाठी खोटी आश्वासने देऊन गप बसल्याचे दिसत आहे. मात्र शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी धावाला योग्य भाव देऊन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
गोठणगाव : परिसरातील हलक्या धानाच्या कापणी मळणीचे काम जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने अनेक रोगराईपासून धानाचे संरक्षण केले आहे. पुढे दिवाळी येत असल्याने शेतकऱ्यांनी कामाला गती आणली आहे. त्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गोठणगाव येथे सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.