रेल्वे स्थानकाची आकस्मिक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:16 IST2017-09-01T01:16:06+5:302017-09-01T01:16:17+5:30
नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस व यापूर्वी झालेल्या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी बुधवारी ...

रेल्वे स्थानकाची आकस्मिक पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस व यापूर्वी झालेल्या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी बुधवारी गोंदिया येथे पोहोचत रेल्वेस्थानकांची पाहणी केली. तसेच बारीकसारीक गोष्टींची चाचपणी केली. त्यामुळे विविध तर्क विर्तक लावले जात आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्व स्थानक आहे. येथून दररोज ७० ते ८० प्रवाशी गाड्या धावतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याची सिमा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने येथील रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने सुध्दा हे गोंदिया स्टेशन महत्वपूर्ण आहे. यासर्व गोष्टी लक्षात घेता या रेल्वे स्थानकाला उत्कृष्ट स्टेशन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अलीकडे झालेले रेल्वेचे दोन तीन मोठे अपघात लक्षात घेता रेल्वेकडून विशेष उपाययोजना राबविल्या जात आहे. बुधवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह गोंदियांचा आकस्मिक दौरा करुन पाहणी केल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे. या पथकातील अधिकाºयांनी रेलटोली परिसरात सुरू असलेल्या पाणी टाकीच्या बांधकामाची पाहणी केली. याच परिसरात असलेल्या रेल्वे कर्मचाºयांच्या जीर्ण झालेल्या निवास्थानाना भेट देऊन कर्मचाºयांकडून माहिती घेतली. काही महिन्यापूर्वीच रेलटोली परिसरात तयार करण्यात आलेल्या कक्षाची व टीआरडी कार्यालयाचे निरीक्षण केले. त्यानंतर पीट लाईनवर जावून पाहणी केली. तसेच रेल्वेच्या विविध विभागाची पाहणी केली. रेल्वे केंद्र, सिग्नल व्यवस्था तसेच काही कामांचे निरीक्षण केल्याची माहिती आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी प्रथमच कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या शासकीय वसाहतीची देखील प्रथमच पाहणी केली.
सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन सुध्दा अधिकाºयांनी दिल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. पथकाने पाहणी केलेल्या कामाचा माहिती अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.