पर्यटनातून रोजगार निर्मिती करा
By Admin | Updated: January 31, 2015 23:23 IST2015-01-31T23:23:45+5:302015-01-31T23:23:45+5:30
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी सूचना

पर्यटनातून रोजगार निर्मिती करा
गोंदिया : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.यावेळी गोंदिया उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, कृषी विकास अधिकारी शिंदे, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कातोरे, तहसीलदार संतोष महाले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे, राजेश चांदेवार, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवहरे, उपजिल्हा शिवसेना प्रमुख शैलेश जयस्वाल, सरेंद्र नायडू उपस्थित होते. ना.शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या दळण-वळण सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेत, तसेच जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकाकडे वळता पाहिजे याचे नियोजनसुद्धा अधिकाऱ्यांनी करावे असे ते म्हणाले. आरोग्यविषयक विविध अडचणींवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातून जास्तीत जास्त सिंचन क्षमता निर्माण व्हावी, यासाठी तलावांच्या खोलीकरणाचे काम यंत्रणांनी हाती घ्यावे, असेही शिंदे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)