शिक्षणासोबतच चांगला माणूस निर्माण करा!
By Admin | Updated: March 23, 2017 01:08 IST2017-03-23T01:08:15+5:302017-03-23T01:08:15+5:30
बौद्धिक ज्ञानवृद्धी व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. घराघरातून बाल मनावर संस्कार दिले गेले पाहिजे.

शिक्षणासोबतच चांगला माणूस निर्माण करा!
संजय पुराम : भरनोली येथील डिजिटल शाळेचे उद्घाटन
अर्जुनी-मोरगाव : बौद्धिक ज्ञानवृद्धी व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. घराघरातून बाल मनावर संस्कार दिले गेले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशवासीयांना ‘माणूस द्या मज माणूस द्या’ हा मूलमंत्र दिला. याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच ‘माणूस’ निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. गुरुजनांनी कर्तव्य म्हणून हे कार्य करावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी केले.
ते आदिवासी, दुर्गम क्षेत्रात येणाऱ्या भरनोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल शाळा उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, पं.स.चे माजी सभापती तानेश ताराम, भरनोली गट ग्रा.पं.च्या सरपंच प्रमिला कोरामी, कन्हैयालाल राऊत, माणिक ठलाल, प्रेमानंद मसराम, गोंगलू ताराम, संजय मानकर, एकनाथ चुटे, उध्दव ताराम, भुमेश्वर ताराम, केंद्रप्रमुख वाय.बी. येल्ले, ग्रामसेवक नरेश बडोले, शिक्षक संघटनेचे कैलास हांडगे, विनोद बडोले, सुरेंद्रकुमार ठवरे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, शिक्षण हे अजरामर आहे. ते मृत्यूपर्यंत संपत नाही. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. मोठी स्वप्नं बघितली पाहिजे. ध्येय निश्चितीकडे वाटचाल करताना अनेक अडचणी येतात. आईवडील व गुरुजनांचे निसंकोचपणे मार्गदर्शन घेऊन मार्गक्रमण केल्यास यशोशिखर गाठता येते.
शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी लाजाळू पण हुशार असतात. वावरताना न्यूनगंड बाळगू नका. पालकांनी मुलांवर निश्चित प्रेम केलं पाहिजे. पण त्यात आंधळे होऊ नका. कर्करोग हा असाध्य आजार उपचाराने बरा होऊ शकतो. मात्र हल्लीची पिढी मोबाईलच्या अत्याधिक वापरापासून बरी होत नाही. पालकांनी नियंत्रण घातले पाहिजे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने जूने दिवस व मातृभूमीचे प्रेम कदापी विसरु नये. प्रत्येकाने पदाचा वापर लोकसेवेसाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील केवळ ४० पटसंख्या असलेल्या भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल शाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेली ही शाळा लोकसहभागातून डिजिटल शाळा म्हणून नावारुपास आली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना संगणक हाताळणीसह शैक्षणिक तंत्रज्ञानाची जाणीव व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.
यावेळी याच शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर जाणारे प्रा. धनराज करचाल, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, शाळेसाठी जमीनदाते घुंगरु ताराम, चरणदास कऱ्हाडे व सदू दर्रो यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक नाईक यांनी मांडले. संचालन प्रफुल्ल कुंभरे यांनी केले. आभार शिक्षिका बोरकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)