बनावट विदेशी दारू तयार करताना पकडले
By Admin | Updated: April 9, 2017 00:07 IST2017-04-09T00:07:57+5:302017-04-09T00:07:57+5:30
स्पिरीटपासून बनावट विदेशी मद्य तयार करून ते विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये भरताना एका इसमाला

बनावट विदेशी दारू तयार करताना पकडले
एकाला अटक : कारूटोला येथील कारवाई
गोंदिया : स्पिरीटपासून बनावट विदेशी मद्य तयार करून ते विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये भरताना एका इसमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गोंदिया तालुक्यातील कारूटोला येथे करण्यात आली. यात त्या इसमाला अटक केली असून त्याच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, कारूटोला येथे बनावट विदेशी मद्य बनविल्या जात असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर गोंदिया ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक बी.जी. भगत यांनी सकाळी ७ वाजता आपल्या सहकाऱ्यांसह कारूटोल्यातील आरोपी सिंधनरेश माणिकचंद बिसेन (३७) याच्या घरी धाड घातली. यावेळी तो स्पिरीटच्या मदतीने बनावट विदेशी दारू तयार करताना आढळला. ती बनावट दारू ‘ओ.सी.ब्लू’ या बँ्रडच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री केली जाणार होती.
पथकाने त्या ठिकाणावरून १८० मिली क्षमतेच्या ओसी ब्लू कंपनीच्या बनावट विदेशी मद्याच्या ३५ बाटल्या, इंपेरियल ब्लू ब्रँडच्या बनावट मद्याच्या १८० क्षमतेच्या १८ बाटल्या, एका २० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये १० लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरिट), तसेच १८० मिलीच्या ४९ रिकाम्या बाटल्या आणि बॉटलिंगकरिता वापरण्यात येणारे बनावट बुच असा एकूण ९ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला.
या आरोपीने बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरिट व बॉटलिंगसाठी साहित्य, बुच कुठून आणले याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दु.निरीक्षक भगत, सहायक दु.निरीक्षक हुमे, जवान पागोटे, उईके व वाहनचालक मडावी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)