आता प्रा.आ.केंद्रात हाेणार कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST2021-03-05T04:29:36+5:302021-03-05T04:29:36+5:30
गोंदिया : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात झाली ...

आता प्रा.आ.केंद्रात हाेणार कोविड लसीकरण
गोंदिया : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. मात्र केवळ तालुका आणि जिल्हा स्तरावरच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामुळे वयोवृध्द नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता प्राथमिक आरोग्य केंद्रात सुध्दा कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्य महासंचालकांनी दिले आहे. त्यामुळे समस्या सुध्दा मार्गी लागली आहे.
गोंदिया जिल्ह्यात १० सरकारी आणि ६ खासगी रुग्णालयातून कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातच लसीकरण केले जात असल्याने ग्रामीण भागातील वयोवृध्द नागरिकांना पायपीट करीत यावे लागत होते. तसेच लसीकरण केंद्रावर पोहचल्यानंतर तेथील गर्दीमुळे तीन ते चार तास त्यांना ताटकळत बसावे लागत होते. यामुळे काही ठिकाणी वृध्दांना भोवळ आल्याचे प्रकार सुध्दा घडले आहे. जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांची परवड थांबू शकते. ही बाब लोकमतने लाूवन धरली होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सुध्दा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यातच गुरुवारी (दि.४) आरोग्य महासंचालकांनी पत्र काढून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा आरोग्य विभाग याचे नियोजन करुन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दररोजच्या लसीकरणाचा कोटा ठरवून देऊन लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
.......
लक्षणे असणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी
कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्याला आता वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नियमांचे पालन करुन गेले वर्षभर घरीच राहावे लागले होते. त्यानंतर आता लसीकरणाच्या निमित्ताने बाहेर पडत आहे. अशात काही ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे असल्याचे सांगितल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
......
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तयारीच्या अनुषंगाने आज बैठक
जिल्ह्यात एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात कोरोना लसीकरण सुरु केेले जाणार आहे. लसीकरणाच्या अनुषंगाने कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि.५) गोंदिया येथे आरोग्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.