कोविड केअर सेंटर झाले कोरोना उद्रेकाचे केंद्र ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:39+5:302021-04-09T04:31:39+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांना दाखल करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले ...

कोविड केअर सेंटर झाले कोरोना उद्रेकाचे केंद्र ()
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांना दाखल करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. पण फुलचूर येथील पाॅलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील बराच सावळागोंधळ गुरुवारी (दि.८) पुढे आला. या केंद्रात दाखल होण्यासाठी रुग्णांना तास तास भर रांगेत लागावे लागले. तर येथे प्रचंड गर्दी झाल्याने हे कोविड केअर सेंटर की कोरोना उद्रेकाचे केंद्र असा सवाल येथील रुग्णांनी केला.
जिल्ह्यात सर्वाधिक १६५७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया येथे आहे. कोरोनाच्या गंभीर नसलेल्या रुग्णांना फुलचूर येथील पाॅलिटेक्निक काॅलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. मात्र या केंद्रावर सोयी सुविधांचा अभाव असल्याची बाब आधीच पुढे आली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.८) या केंद्रात दाखल होण्यासाठी चक्क काेविड बाधित रुग्णांची रांग लागली होती. रांगेत कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन अथवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला. वयोवृध्द रुग्णांना सुध्दा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागले. मात्र त्यांना साध्या पाण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे या केंद्रावर बराच वेळ गोंधळ उडाला होता. त्यामुळे येथील सर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर टाकून संताप व्यक्त केला. मात्र यासर्व प्रकारावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.
......
अशी गैरसोय होण्यापेक्षा होम क्वारंटाईनची परवानगी द्या
फुलचूर येथील पाॅलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची गुरुवारी प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी यावर संताप व्यक्त केला. आरोग्य प्रशासनाला सोय करणे शक्य होत नसेल तर होम क्वारंटाईन राहण्याची परवानगी देण्याची मागणी केली.
.........
वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य विभाग गोंधळला
जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपाययोजना करताना आरोग्य विभागाची सुध्दा तारांबळ उडत आहे. आधीच अपुऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण वाढत्या रुग्ण संख्येने विभागाची अडचण झाली आहे.
......
कोट
पाॅलिटेक्निक कॉलेजमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल संबंधित अधिकारी आणि पोलीस विभागाला सुध्दा उपाययोजना करुन येथील समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे.
रुग्णांची गैरसोय होणार नाही याची निश्चितच काळजी घेतली जाईल.
- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी गोंदिया.