रापेवाडातील जागेची न.प.कडून मोजणी
By Admin | Updated: December 4, 2014 23:11 IST2014-12-04T23:11:09+5:302014-12-04T23:11:09+5:30
जवळील ग्राम कटंगी येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली जागा वांद्यात आल्याने नगर परिषदेने ग्राम रापेवाडा येथे एक जागा बघून ठेवली होती. रापेवाडा येथील या जागेची नगर

रापेवाडातील जागेची न.प.कडून मोजणी
गोंदिया : जवळील ग्राम कटंगी येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली जागा वांद्यात आल्याने नगर परिषदेने ग्राम रापेवाडा येथे एक जागा बघून ठेवली होती. रापेवाडा येथील या जागेची नगर परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बघून ठेवलेल्या या जागेतील सुमारे १० एकर जागा पालिकेला घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी हवी असल्याने नगर परिषदेने या जागेची मोजणीही केली आहे.
शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेकडे व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती कार्यरत असते. मात्र या प्रकल्पासाठी लागणारी जागा पालिकेकडे नसल्याने पालिका मागील दोन वर्षांपासून जवळील ग्राम कटंगी येथील एका जागेवर शहरात निघणारा घन कचरा टाकत होती.
याच जागेवर हा प्रकल्प उभारण्यात यावा यासाठी पालिकेचे प्रयत्नही सुरू होते. मात्र मध्यंतरी घेण्यात आलेल्या घन कचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विमान प्राधीकरण बिरसी विमानतळचे प्रबंधक अवधेषकुमार यादव यांनी कटंगीची ही जागा बिरसी विमानतळापासून १० किमी. अंतराच्या आत येत असल्याने त्याला विमान प्राधीकरण नियमानुसार परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट केले. शिवाय अन्य काही कारणांना घेऊनही ही जागा प्रकल्पासाठी उपयुक्त नसल्याचे निर्दशनास आले.
समितीतील या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना प्रकल्पासाठी अन्य जागा शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेने जवळील ग्राम रापेवाडा येथील गट क्रमांक ६४३ मधील एक जागा बघितली आहे. बघण्यात आलेल्या जागेतील सुमारे सात एकर जागा प्रकल्पाला मिळावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून यासंबंधात कारवाई सुरू होती.
अशातच नगर परिषद अध्यक्ष कशिश जायस्वाल, उप विभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसिलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप विभागीय अधिकारी भड यांनी २ डिसेंबर रोजी रापेवाडा येथे बघून ठेवलेल्या जागेची पाहणी केली. प्रकल्पाच्या दृष्टीने ही जागा सर्वांनाच आवडल्याने ३ डिसेंबर रोजी नगर रचना सहायक संचालक श्रीमती थूल यांनीही तहसिलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगर परिषद नगर रचना विभागातील सलाम कुरेशी व अन्य अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी केली.
एवढेच नव्हे तर नगर परिषदेला आवश्यक एवढ्या जागेची मोजणी सुद्धा करविली. एकंदर पालिका या जागेला घेऊन गंभीर दिसत असून त्यामुळेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी यात एवढा रस घेतला. आता या जागेला घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अपेक्षीत आहे. (शहर प्रतिनिधी)