कापूस परवडेना, सोयाबीनला भाव
By Admin | Updated: November 6, 2014 22:59 IST2014-11-06T22:59:20+5:302014-11-06T22:59:20+5:30
यंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी

कापूस परवडेना, सोयाबीनला भाव
शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनचे उत्पन्न नसल्याने दरवाढ तोट्याचीच
विजय माहुरे - घोराड
यंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी असल्याने त्याचा उपायोग नसल्यागत आहे. कापूस शेतातून घरी येणे सुरू झाल्याने दर वाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
बाजारात कापूस ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकाचा लागत आहे. सीतदहीच्या उच्च प्रतिच्या कापसाला हा दर मिळत असल्याने शेवटी येणाऱ्या फरतडीचा दर काय असणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना आतापासून भेडसावत आहे. दुबार तिबार पेरणीने विलंब झाल्याने कापूस येण्यास विलंब झाला. त्यातच मर रोग व लाल्याच्या थैमानामुळे उत्पन्नात घट येणार हे निश्चित असताना खर्चापेक्षा कमी भावाने कापूस विकण्याची वेळ कापूस उत्पादकावर आली आहे.
सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांच्यावर दर मिळत आहे. मात्र सोयाबीनचे उत्पन्न निघण्याचे संकेत नाही. शेतकऱ्यांनी एकरी एक क्विंटलचा उतारा मिळत आहे. सरासरी एकरी चार क्विंटलची उतारी येत आहे. यामुळे मिळणारा दर सोयाबीनकरिताही अत्यल्प ठरत आहे. उत्पन्न नसल्याने या वाढीव दराचा विशेष लाभ घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही.
अस्माणी व सुलतानी संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना सतत तीन वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत आहे. हे दृष्टचक्र कधी थांबणार याच प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले नाही तर शेती हा व्यवसाय तोट्याचाच ठरत राहणार आहे. कृषी प्रधान देशात शेतकऱ्याची व्यथा कायमच राहणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
नापिकी झाली असतांना महसूल विभागाची आणेवारी ५० पैशांच्यावर कशी राहते हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यातूनही काहीच मिळत नसल्याचे वास्तव आहे.
पहिल्या दिवशी ३ हजार ९५० रुपयांचा दर
देवळी येथील श्रीकृष्ण जीनिंग फॅक्टरीत भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी ३ हजार ९५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. खरेदीचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप तायवाडे, मोहनलाल अग्रवाल व सीसीआयचे केंद्रप्रमुख पन्नालाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम शालीक येंडे व चेतन येंडे या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा नारळ-पान देवून सत्कार करून कापूस गाड्यांचे पूजन करण्यात आले.
सीसीआयच्या खरेदीला सुरुवात होत असल्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या. ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कापसाचे भाव घुटमळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यावेळी विनोद धिया छितरमल वर्मा, पप्पू टावरी, महेश अग्रवाल व माणक सुराणा यांची उपस्थिती होती.