तरतुदीपेक्षा खर्च कमीच
By Admin | Updated: March 27, 2015 00:33 IST2015-03-27T00:33:09+5:302015-03-27T00:33:09+5:30
एकीकडे शहरातील अनेक भागातील रस्ते वारंवार उखडून जात असताना नगर परिषदेने रस्ते बांधकामासाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेला निधीही खर्च पुरेसा खर्च केलेला नाही.

तरतुदीपेक्षा खर्च कमीच
लोकमत विशेष
कपील केकत गोंदिया
एकीकडे शहरातील अनेक भागातील रस्ते वारंवार उखडून जात असताना नगर परिषदेने रस्ते बांधकामासाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेला निधीही खर्च पुरेसा खर्च केलेला नाही. अशात शहरातील रस्त्यांची अवस्था कशी सुधारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अन्य विषयांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीतील एक दमडीही खर्च करण्यात आली नसल्याने तो निधी तसाच पडून असल्याचेही दिसून येत आहे.
गेल्यावर्षी नगर परिषदेने वर्ष २०१४-१५ करिता जो अर्थसंकल्प सादर केला त्यात अनेक बाबींसाठी निधीची तरतूद केली होती. मात्र आता हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस उरले असताना त्यातील अनेक बाबींसाठी नियोजित केलेला निधी खर्चच झालेला नाही.
शहरवासीयांना नगर परिषदेकडून चांगले रस्ते, रस्त्यांवर उजेड व सफाई एवढ्या किमान अपेक्षा आहेत. मात्र नागरिकांच्या या क्षुल्लक गरजाही पूर्ण करण्यात गोंदिया नगर परिषद अपयशी ठरत आहे. शहरातील रस्त्यांचे हाल बघता एखाद्या गावातील रस्तेही त्या रस्त्यांपेक्षा चांगले असतात, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. शहरातील बहुतांश भाग रात्रीला अंधारात असतो. सफाईचा पार बोजवारा वाजल्याने शहरात घाणीचे साम्राज्य असते. यासाठी नगर परिषदेकडे पैसा नाही असे नाही. मात्र पैसा असूनही त्याचा योग्य तो वापरच करण्यात आला नाही, असे नगरपरिषदेच्या हिशेबातून दिसून येत आहे. अल्पसंख्याक अनुदान, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, कमी खर्चाची स्वच्छता योजना, दलित वस्ती पाणी पुरवठा, १३ वा वित्त आयोग आदी अन्य विषयांतही अत्यल्प निधी खर्च करण्यात आल्याचे दिसते.