रोहयोच्या कामात भ्रष्टाचार

By Admin | Updated: September 21, 2015 01:42 IST2015-09-21T01:42:14+5:302015-09-21T01:42:14+5:30

पं.स. आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत जवरी येथे रोजगार हमीच्या कामात बोगस मजुरांची हजेरी दर्शवून शासन ...

Corruption in Roho's work | रोहयोच्या कामात भ्रष्टाचार

रोहयोच्या कामात भ्रष्टाचार

बोगस मजुरांची हजेरी : जवरी येथे केली पैशाची उचल
कालीमाटी : पं.स. आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत जवरी येथे रोजगार हमीच्या कामात बोगस मजुरांची हजेरी दर्शवून शासन तिजोरीला लाखोंचा चुना लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तशी तक्रार जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
आमगाव तहसील अंतर्गत जवरी येथे २०१४ ते १५ या कालावधीत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत हनुमान मंदिर जवळील मालगुजारी तलाव, चौकी तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, भात खाचर, साठवण बंधारा, वृक्ष लागवड, शतकोटी वृक्ष लागवड व सिंचन विहीर बांधकाम करण्यात आले. सदर कामे ग्रा.पं. अंतर्गत करण्यात आले. सदर कामात मजुरांची बोगस नावे चढवून मोठ्या प्रमाणात लाभार्थी व संबंधित प्रशासनाने ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’ या प्रमाणे शासन निधीवर डल्ला मारला.
जवरी येथील चंद्रकुमार गायधने यांनी माहितीचा अधिकारांतर्गत संबंधित मस्टरची माहिती मागितली. त्यात १० मजुरांचे नाव गहाळ करण्यात आले. तसेच एमबी रेकार्डवर क्रमांक नाही, पेज क्रमांक नाही, रोजगार सेवकाची स्वाक्षरी नाही. ग्रामसेवकाची तसेच गट कार्यक्रम अधिकारी यांची स्वाक्षरी नाही. तरीदेखील मस्टर मंजूर करण्यात आले. यात मजूर धनराज हटवार हे गृहरक्षक दलात कार्यरत आहेत व २६ जून ते १ जुलैपर्यंत निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस ठाणे आमगावला कार्र्यरत होते. पण मस्टरमध्ये २४ जून ते ३० जून १५ पर्यंत हजेरी लावण्यात आली. हे कसे शक्य होईल? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तसेच शामलाल मेंढे सिंचन विहिरीवर कामावर नसून कुल्पा-कारंजा येथे वीटभट्टीच्या कामावर रुजू असताना त्यांचे नाव मस्टरमध्ये आहे आणि मजुरीही काढण्यात आली. तसेच बकाराम गायधने या मजुराला मस्टर क्रं. २२७० मध्ये सात दिवसांचे दोन हजार ६७० रुपये कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आले, याबाबत चौकशी व्हावी. रोजगार सेवकाची मुलगी मोहिनी अशोक गायधने शिक्षण घेत आहे, पण गावातील रोहयोच्या प्रत्येक कामावर हजेरी लावण्यात आली.
तसेच अमृत गायधने, सरस्वता हत्तीमारे, आशा दिवाळे, वर्षा अशोक डोये, ईश्वर गायधने, दुलीचंद पाथोडे, अमोल गायधने, ज्योती तिरपुडे, मनिराम फुंडे, राधेश्या बकाराम गायधने, मुलचंद गायधने, श्यामलाल मेंढे, शकुंतला मेंढे आदी मजुरांची बोगस हजेरी लावून पैशाची उचल करण्यात आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर रोहयोच्या कामावर सिमेंट व इतर साहित्य ने-आण करण्यासाठी बाबुलाल गायधने यांची बैलबंडी उपयोगात आली. पण या संबंधीची हजेरी धनराज हटवार यांच्या नावे काढण्यात आली. असे बोगस मस्टर तयार करण्यात आले. सदर रोहयो कामात मस्टरमध्ये निवडणूक दिवशी, आढवडी बाजाराच्या दिवशी सुट्टी असते. परंतु हजेरीपट क्रं. ३७०४ मध्ये सातही दिवस चक्क हजेरी दर्शविण्यात आली. सदर भोंगळ कारभार तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. (वार्ताहर)

Web Title: Corruption in Roho's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.