निमगाव, बोंडगावदेवी व भिवखिडकी येथे कोरोना लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:39+5:302021-04-24T04:29:39+5:30
बोंडगावदेवी : मागील काही दिवसांपासून परिसरात कोरोना संक्रमणाची तिव्रता वाढत आहे. सर्वसामान्यांमध्ये कोरोनाविषयी भीती दूर होऊन जनजागृतीबरोबरच मिशन कोरोना ...

निमगाव, बोंडगावदेवी व भिवखिडकी येथे कोरोना लसीकरण ()
बोंडगावदेवी : मागील काही दिवसांपासून परिसरात कोरोना संक्रमणाची तिव्रता वाढत आहे. सर्वसामान्यांमध्ये कोरोनाविषयी भीती दूर होऊन जनजागृतीबरोबरच मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र चान्नाच्यावतीने गावस्तरावर राबविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी श्वेता कुळकर्णी यांच्यासह संपूर्ण आरोग्य पथकाच्यावतीने निमगाव, बोंडगावदेवी, भिवखिडकी येथे प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच सिरेगाव येथे कोरोना चाचणी शुक्रवारी (दि.२३) घेण्यात आली.
गावपातळीवर कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. ठिकठिकाणी कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. कोरोना बाधित निघालेल्या गृहविलगीकरणात असलेल्या काही रुग्णांची प्रकृती खालावल्याने इतरत्र हलविण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या जीवघेण्या घटनेमुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपलब्ध असलेल्या साधन सामग्री तसेच मनुष्यबळाच्या सहकार्याने चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या कार्यतत्पर सूचक मार्गदर्शनाखाली डॉ. कुंदन कुलसुंगे, आरोग्यसेवक, सेविका यांच्यासह कार्यक्षेत्रात कोरोना चाचणी करून मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. परिसरातील ग्रामपंचायतच्यावतीने ध्वनीक्षेपनाद्वारे गावकऱ्यांना सूचना करून लसीकरण करण्यासंबंधी प्रवृत्त केल्या जात आहे. प्रकृतीत अस्वस्थता तथा ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसून येताच जनतेने कोरोना चाचणी करण्यासाठी नि:संकोच पुढे येण्याचे आवाहन डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी केले. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होते तसतसे लसीकरण राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी कळविले.
............
कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. उपलब्ध असलेल्या आरएटी किटद्वारे चाचणी केल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होते. गुरुवारला (दि.२२) ४५ जणांची चाचणी केली असता परिसरातील पाच जण कोरोना बाधित आढळून आले. शुक्रवारी (दि.२३) सिरेगाव येथे १७ जणांची चाचणी केली असता सहा जण कोरोना बाधित निघाले, बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.
........